पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काठी असे निरर्थक समज तयार झाले आहेत.लिंग-चाचणी ही चांगल्या कामासाठी निष्पन्न झालेली वैज्ञानिक गोष्ट. मात्र त्याआधारे असंख्य निरपराध मुलींची हत्या राजरोसे सुरू आहे. अशा विचित्र आकाराला आलेल्या समाजशास्त्र वास्तवाची कैफियत या कथांमधून मांडली आहे. पुरुषी श्रेष्ठत्वाच्या भावनेने हे आधुनिक ज्ञानाच्या आधारे हत्यासत्र चालू आहे. या विविध मालाकथांमधून स्त्रीभ्रूणहत्येविषयीचे चित्र केले आहे. वर्तमानात आणि भविष्यात अमानवी स्वरूपाचा विषम समाज आपण रचत आहोत याचे गंभीर भान या कथा देतात.
 गर्भातच मारल्या गेलेल्या अनेक अनाम कळ्यांचे व त्यांच्या मातांचे आक्रोश या कथांमध्ये आहेत. 'लंगडा बाळकृष्ण' या कथेत प्रतीकात्मक स्वरूपात या स्त्रीभ्रूणहत्येच्या क्रौर्याची परिसीमा काय असू शकते याचे खोलवरचे भेदक असे चित्रण आहे. या कथाचित्रणाला समकाळातील सत्यघटनेचे संदर्भ आहेत. चिमण्या गर्भाला नाहीसे करण्यासाठी डॉक्टर पतीने दवाखान्यात दोन कुत्री बाळगलेली असतात. मात्र प्रत्यक्ष स्वत:च्याच मुलाचा लचका ही कुत्री तोडतात त्यावेळी डॉक्टर कुत्र्यांवर गोळ्या झाडतात. 'केस स्टडीज' या अनोख्या कथेत भविष्यात येऊ घातलेल्या सामाजिक समस्येचे चित्रण आहे.

 १९९१ - कांद्यापोह्याची सेंचुरी, २०११ - नकाराचा सिक्सर पण मुलीकडून २०३१ - किंवा नंतरचं दशक गे-वरवधू सूचक मेळावा या क्रमाने विषम समाजरचना तयार होते आहे. विवाहसंस्थेचा प्रश्न किती बिकट होईल याची सूचना या कथेत आहे. भारतभूमी ही लँड विदाऊट डॉटर्स होते आहे याची जाणीव या सर्व कथा देतात. 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' कथेत पोटातल्या मुलीचा आपल्या आईबरोबरचा संवाद आहे. ती मुलगी आईला म्हणते, ममा, तू सावित्रीची लेक होतीस. आहेस, पण तुझा नवरा - माझा बाप-पपा ते कुठे ज्योतीरावाचे वारस आहेत? विचारानं ते तर जुन्या काळातले सरंजामवादी व आजच्या काळातले भांडवलदार आहेत. ज्यांच्या लेखी स्त्री ही एक क्रयवस्तू आहे आणि तिचं मूल्य नगण्य आहे. ती पुरुषांना हवी तेवढीच, तेवढ्या प्रमाणात, मालकी हक्कानं हवी बस, या विचारदृष्टीचा प्रभाव त्यांच्या या सबंध कथांवर आहे. या कथेतील मुलगी शेवटी म्हणते, 'ही कथा वाचून काही पुरुषांच्या डोळ्यात अंजन पडलं तरी माझ्या न जगलेल्या जन्माचं सार्थक होईल.' असा या सर्व कथेचा हेतू आहे. या समस्याप्रधान विचारकथा आहेत. देशमुख हे कोल्हापूरला जिल्हाधिकारी असताना 'सेव्ह द बेबी गर्ल हे अभियान राबविले होते. या उपक्रमाद्वारे समाजात जाणीवजागृती होण्यास मदत झाली होती. या थीमबेस्ड कथांमधून स्त्रीभ्रूणहत्येची यंत्रणा, त्यातील बारकावे व समाजाची मानसिकता याचे बारकाईने चित्रण आले आहे. बदलत्या मानसिकतेतून व विकृत हव्यासाचा भयावह आलेख या कथांत आहे.

लक्षदीप ॥ ११ ॥