पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "वेल हॅम, व्हाट शुड आय से अबाऊट धिस?" सॅमचा स्वर गोंधळलेला वाटत होता. “मी - मी जातीच्या संदर्भात याचा कधी विचार केला नाही. तुला पुरेशी संधी न देता वगळण्यात आलं हे खरं आहे आणि सौरभ-राहुलवर सुरुवातीला पुअर खेळत असूनही निवड समितीनं त्यांच्यावर विश्वास टाकला. त्यांना सातत्यानं संघात स्थान दिलं हेही खोटं नाही, पण त्याचा जातीशी संबंध लावणं? यू आर फार स्ट्रेचिंग युवर इमॅजिनेशन आऊट ऑफ डेस्परेशन....."
 “नाही दोस्त, इंडियात जात हे असं सत्य आहे की, सवर्ण ते नाही असं समजून दडपायचा प्रयत्न करतात आणि पददलितांना पदोपदी त्याचा सामना करावा लागतो...." हॅम म्हणाला, “परवा दक्षिण ऑफ्रिकेत मला अनायासे दरबनला युनोनं आयोजित केलेल्या रेसिजमच्या जागतिक परिषदेत सहभागी होता आलं. नो, आय अॅम नॉट क्रुसेडर. मी एका क्लबच्या आमंत्रणावरून तिथं महिनाभर काही कंट्री मॅचेस खेळण्यासाठी गेलो होतो. आणि तिथं माझा रणजीत हरवलेला फॉर्म गवसला. मी ज्या क्लबच्या वतीनं खेळलो, तो विजयी ठरला आणि मला सीझनचा सर्वोत्कृष्ट बॅटसुमन आणि मॅन ऑफ द सिरीजचा किताब मिळाला.... त्या निमित्तानं मी दरबनला होतो. तिथं मला काही महाराष्ट्रातले दलित नेते व कार्यकर्ते भेटले व त्यांच्या बरोबर त्या परिषदेत सहभागी झालो. इट वॉज अॅन आय ओपनर फॉर मी. सॅम, तिथंच मला माझ्या कास्टची, त्याहून जादा त्यामुळे होणा-या डिसक्रिमिनेशनची जाणीव झाली... मला जे माझ्या विरुद्ध सौरभ, राहुलच्या संदर्भात वाटायचं, त्याला एक प्रकारे पुष्टी मिळाली."
 सॅम शांतपणे पलीकडून ऐकत होता. त्याचा जड व भारी श्वास कॉर्डलेसच्या यंत्रातून निलू नेमका टिपत होती, सॅम हतबुद्ध झाला होता.
 “सॉरी सॅम, मी भरकटत गेलो बोलताना. जाऊ दे, तुला ते नाही समजणार यार."
 “खरंय ते दोस्त. नाही तरी मी जनरल नॉलेज व अवेअरनेससंदर्भात बुद्धच आहे. पण तुझ्या स्वरातील वेदना मला एनलायटन करून गेली.... यू - यू मे बी राईट. यू आर सर्टनली, आय मस्ट से, डिस्क्रिमिनिटेड अॅट दी टाईम ऑफ सिलेक्शन."
 “अँक्यू सँम. निदान तुला तरी कळलीय माझी वेदना."
 “हॅम मी येतोय, प्लीज नाही म्हणू नकोस. मी तुझं काही एक ऐकणार नाही. निळूभाभी, मला माहितेय. एकदा हॅमनंच सांगितलंय की तुम्ही आमचं बोलणं नेहेमी कॉर्डलेसचं बटन ऑन करून ऐकता म्हणून. तर भाभी, ऐकताय ना, मी येतोय तुमच्या हातचा प्रॉन खायला. आणि सॅमने रिसिव्हर ठेवून दिला. तो काही मिनिटातच त्याच्याकडे यायला निघेल आणि पंधरा मिनिटात पोहोचेल. त्यामुळे निलु उठली आणि हॅमचे खांदे किंचित थोपटीत किचनकडे डिनरच्या तयारीसाठी वळली.

 हॅमच्या हातात अजूनही व्हिस्कीचा प्याला होता. त्यानं पाय लांब करात

११८ । लक्षदीप