पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकता येणार नाही.
 मीना, तू संपलीस. खलास झालीस, आता जगाला कशी तोंड दाखवशील? का - का जगायचं आता?
 पण दीड महिना दररोज अनेक वेळा आत्महत्येचे विचार मनात येऊनही कोणती जीवनलालसा तिला त्यापासून परावृत्त करीत होती देव जाणे, पण परवा पुन्हा एकवार ती विकल अवस्था आली. तो क्षण तिला फार असह्य झाला आणि घरी आणलेलं जनावराचं औषध पिऊन जीवन संपविण्याचा निर्णय तिनं घेतला, पण - पण तिच्या दुर्दैवानं ती वाचली.
 आज मंजुळाभाभीची भेट झाली आणि वाटलं, बरं झालं, आपण वाचलो ते. भाभी वकील आहेत. त्यांनी वचन दिलंय, तुझी खेळाची पुन्हा कारकिर्द सुरू करून देईन म्हणून.
 असं होईल?
 एक गोड भाबडी आशा मन पुलकित करून गेली.
 पण हे कसं शक्य आहे? तो मेडिकल रिपोर्ट भाभी खोटं आहे हे कसं सिद्ध करतील?
 नाही मीना, भाभीवर विश्वास ठेव, त्या मोजकं बोलतात, पण ठाम बोलतात, खरं बोलतात आणि बोललेलं खरं करून दाखवतात.
 मला वाट पाहिली पाहिजे - बस.
 किती वेळा माहिती नाही, पण भाभी, तुमच्यावर केवळ विश्वासच नाही तर श्रद्धा आहे. मी प्रतीक्षा करेन. शांतपणे, खंबीरपणे. कितीही वेळ लागू दे.
 मी स्त्री आहे, हे सिद्ध करा. पदक न मिळू दे, पुन्हा खेळायची संधी न मिळू दे. पारध्यानं बहाल केलेली ‘मर्दसिंग'ची मनमानसावरची तप्त मुद्रा पुसून काढायची आहे. बस एवढं करा माझ्यासाठी भाभी.”
 मंजुळा मुंबईत आली तेव्हा दोन दिवस विद्यानं चक्क रजा टाकली. तिनं एक क्रीडावैद्यक शास्त्रातला नावाजलेला तज्ज्ञ डॉक्टर आणि आंतरराष्ट्रीय कायद्याची जाण असलेला एक ज्येष्ठ वकीलही बोलावून घेतला होता. मंजुळाही बरंच होमवर्क करून आली होती.
 डॉक्टर व वकील दोघांचंही चर्चेअंती एकमत झालं होतं.

 “मॅडम, मीनाची केस ही कंप्लीट अॅण्ड्रोजन इन्सेसिटिव्हिटी सिंड्रोमची केस आहे. इथं पुरुषाप्रमाणे स्त्रीमध्ये एक्स - वाय गुणसूत्रं असतात. आणि अॅण्ड्रोजन नावाचा पुरुषी हार्मोन असला तर तो स्वीकारण्यासाठी रिसेप्टर नसतो. अशा जीवात पुरुषी इंद्रिये विकसित होत नाहीत. उलट सर्व स्त्री इंद्रिये उमलन येतात, असं नैसर्गिकरीत्या एक्स क्रोमोझोममध्ये बदल - म्युटेशन घडून येतं. अशी कंप्लीट

१०६ । लक्षदीप