पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तिच्यात 'वाय' गुणसूत्रामुळे काही पुरुषी तत्त्वं होती व त्यामुळे तिचा त्याचा अवाजवी फायदा खेळताना इतर महिला खेळाडूंच्या तुलनेत मिळण्याचा संभव होता. या कारणास्तव तिला लिंगचाचणीत नापास करण्यात आलं असल्याचा मेडिकल टीमचा अंतिम निष्कर्ष होता.
 “पण सर, मॅम, - गतवर्षी सेऊल कोरियामध्ये आशियाई ट्रॅक व फिल्ड स्पर्धेतही मला पदक मिळालं होतं. तेव्हा नाही कुणाला संशय आला? माझ्या बर्थ सर्टिफिकेटवर डॉक्टरांनी लिंग म्हणून फिमेल असंच लिहिलं होतं."
 "त्याचं असं आहे मीना, अलीकडं सरसकट जेंडर टेस्ट घेतली जात नाही. कुणी मागणी केली तरच केली जाते.”
 माझ्या संदर्भात कुणी मागणी केली ते मला कळेल?”
 "ते गुपित असतं. असं उघड करता येत नाही. सॉरी.”
 मेडिकल टीमनं सांगितलं नाही तरी तिला दुस-या दिवशी कळलंच. कारण त्या दिवशी १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सानिया ही मुंबईची धावपटू धावली होती व तिला त्यात कांस्य पदक मिळालं होतं. जर मीना धावली असती तर तिला सुवर्ण पदक नक्की होतं.
 मीनाचीं राष्ट्रीय संघात निवड होण्यापूर्वी सानिया ही निर्विवादपणे भारताची नंबर एकची खेळाडू होती. लाँग डिस्टन्स रनर कॅटेगरीमधील, खास करून ८०० आणि १५०० मीटरच्या शर्यतीमध्ये. पण मीनानं तिच्यापेक्षा दोन ते पाच सेकंदांचा कमी अवधी घेऊन तिला मागे टाकलं होतं. तेव्हापासून तिची मीनावर खुन्नस होती!
 अॅथलेटिक्स टीमचे मॅनेजर व सानियाची विशेष दोस्ती ही उघड बात होती. सानिया एका बड्या व श्रीमंत कारखानदाराची कन्या होती. आणि तिच्या गुडबुकमध्ये राहणं मॅनेजरसाठी फायद्याचं होतं. पुन्हा ती देखणी होती. मीडियाची लाडकी स्टार होती. टेनिसपटू अॅना कुरनिकोव्हाप्रमाणे तीही खेळापेक्षा सौंदर्य, फॅशन्स आणि जाहिरातीमुळे जास्त प्रसिद्धीच्या झोतात होती.
 याउलट मीना काळीसावळी, कृश, पुरुषांच्या नजरेत भरणाच्या कोणत्याही स्त्री खुणा नाहीत. उंच व 'टोन्ड बॉडी'मुळे तिच्या व्यक्तिमत्त्वात काहीशी पुरुषी झाक होती. तिच्या ओठावर लवही जरा वाजवीपेक्षा जादाच होती. आणि तिचं ते तिच्या स्त्रीत्वाचं अपमान करणारं टोपण नाव 'मर्दसिंग सानियाला कुठून तरी कळलं होतं. ते ती प्रत्येक वेळी मीनाचा उल्लेख त्याच नावानं करून तिचा पुरुषीपणा अधोरेखित करीत होती.

 ८०० मीटर्सच्या शर्यतीत सानियाला मीना असताना उतरायाची संधी नव्हती. त्या दिवशी ती नुसती ओल्या लाकडासारखी धुमसत जळत होती. एका आंधळ्या सूडानं व विकृत तिरस्कारानं ती जणू मंत्रभारित अमानुषपणे भारली गेली होती. तिनं

लक्षदीप । १०३