पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पण आज वकील म्हणून विचार करताना तिचं व किशोरचं अफेअर व त्या रात्री त्याच्या खोलीतून मीनाचं येणं महत्त्वाचा दुवा वाटत होतं. त्या रात्री त्यांचा शरीरसंग झाला असेल का? हे तिला संभाव्य न्यायालयीन आव्हानासाठी महत्त्वाचं वाटत होतं; पण तिला बराच अभ्यास करणे भाग होतं. शास्त्रीय माहिती समजून घेणे आवश्यक होतं.
 तिला तिची माहेरची मैत्रीण विद्या आठवली, ती कलेक्टर असताना उस्मानाबादहून मीनाला तिची सर्वोत्तम लाँग डिस्टन्स रनर होण्याची क्षमता लक्षात घेऊन पुण्याला बालेवाडीच्या क्रीडा प्रबोधिनीत पाठवलं होतं आणि मंजुळाला तिची स्थानिक पालक व्हायची विनंती केली होती. आता विद्या मुंबईला मंत्रालयात सचिव पदावर आहे. मंजुळाची व तिची मैत्री आजही कायम आहे.
 तिनं तातडीनं विद्याला फोन लावला. तेव्हा विद्या तिचं सारं ऐकल्यावर म्हणाली "मंजुळा, मलाही जेंडर टेस्टमध्ये मीना फेल होण्याची न्यूज शॉकिंग वाटली होती; पण मी माझ्या व्यग्र दिनक्रमात विसरून गेले होते बघ." विद्याच्या शब्दांत काहीसा अपराधीपणा जाणवत होता. “तिला मी पुण्याला पाठवताना तिची पूर्ण काळजी घेईन म्हणून तिचा घरच्यांना वचन दिलं होतं; पण खैर - आय अॅम अशेम्ड ऑफ मायसेल्फ."
 “नाही विद्या, उगीच असा विचार करू नकोस!” मंजुळा म्हणाली, "अजूनही तुझा तो मनस्वी स्वभाव कायम आहे, याचं बरं वाटलं."
 “ठीक. मी डॉक्टर आहे, आज जरी मेडिकल सायन्सपासून कोसो मैल दूर प्रशासनात आले असले तरी, थोडाफार टच कायम आहे मेडिकल फिल्डशी. मी जेंडर टेस्टची पूर्ण शास्त्रीय माहिती मिळवते; पण तू सांग, केव्हा येशील मुंबईला तू? आपण चर्चा करून फ्युचर कोर्स ऑफ अॅक्शन ठरवू या. जर मीनावर खरंच अन्याय झाला असेल तर वुई मस्ट फाईट. आय अॅम वुईथ यू.”
 "बँक्यू विद्या! हा केवळ कायद्याचा प्रश्न नाही. यात अनेक मॉरल आणि जेंडर इश्यू पण इन्व्हॉल्ह आहेत. लेटस् स्टडी इन डेष्य.”
 मंजुळा व सुरेशच्या येण्यानं मीनाला बराच धीर आला होता. मंजुळेचं आश्वासन तिच्या मनावर हळुवार फुकर घालून गेलं होतं. “मीना, तुझं पदक मी तुला परत मिळवून देईन. तुझी क्रीडा कारकिर्दही पुन्हा सुरू होईल, हे मी पाहीन. माझं हे तुला वचन आहे. फक्त तू धीरानं घे आणि लवकर बरी हो."

 मीनाला तिची दोह्याला घेतलेली लिंगनिदान चाचणी व तिला मेडिकल टीमनं सांगितलेला निष्कर्ष आठवत होता. तिच्या गुणसूत्रांमध्ये (क्रोमोझोम्स) पुरुषासारखंच 'वाय' सूत्र होतं. पुन्हा तिला पाळी न येणं आणि अंशरूपानं पुरुषी लैंगिक अवयव बीजरूपाने का होईना शरीरात असणं यामुळे तिचं निर्विवाद स्त्रीत्व सिद्ध होत नव्हतं.

१०२ । लक्षदीप