पान:लंकादर्शनम्.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



७४

हे झाड समुद्रापासून दूरच्या प्रदेशांत होत नाहीं. पिवळट तांबड्या व खोल पण चिकण नसणाऱ्या जमीनीत ही झाडे चांगली वाढतात.

 रोपे लावल्यापासून पांचव्या वर्षी पीक येते. एका एकरांत सुमारे ८०० झाडे लावतात व दर झाडास सुमारे ३०० सुपारी येते. सुपारी पिकण्याचा हंगाम नोव्हेंबर ते जानेवारी पर्यंत असतो. सुपाऱ्या उतरल्यावर त्या पाण्यांत शिजवितात व पाणी तांबडेलाल होते. अति जुन्या किंवा कोवळ्या सुपारीस रंग येण्याकरितां त्यांना या लाल पाण्यांत शिजवून रंग देतात. सुपारी शिजवून जो अर्क निघतो तो घट्ट केला म्हणजे सुपारीचा कात होतो. कातडे रंगविण्यास या काताचा उपयोग होतो.

 सीलोनमध्ये सुपारीची लागवड फार मोठ्या प्रमाणांत होते. लोकांच्या घराच्या आवारांतही सुपारीची झाडे आहेत. सुपारीच्या बागांमधून मिरे व नागवेल ( पाने ) यांचे वेल, वेलदोडे व अननस लावितात. अननस सीलोनमध्ये फार पिकतो. जुन्या जखमा भरून येण्याकरितां कोवळ्या सुपारीची पूड वापरण्याची चाल सीलोनमध्ये फार आहे.

 मलबार, म्हैसूर, कारवार, गोवा, बंगाल, मद्रास इलाख्यांतील पूर्वकिनाऱ्या जवळील कांहीं भाग इत्यादि ठिकाणी सुपारी फार पिकते तथापि हिंदुस्थानांत सुपारीचा खप फारच मोठा असल्यामुळे सुमारे १ कोटि रुपयाची सुपारी चीन, मलाया, सीलोन, स्ट्रेटसेटलमेंट व सुमात्रा इत्यादि ठिकाणाहून येते.



कॉफी.

 कॉफी हें सीलोनमधील एक महत्वाचे पीक होते, परन्तु सांप्रत तेथे काफी थोडी पिकते. कॉफी हे झाड आफ्रिकेच्या उष्ण ( विषुववृत्ताजवळील ) प्रदेशांत समुद्रसपाटी पासून १|२ हजार फूट उंचीवर नैसर्गिक स्थितीत सांपडते. तेथून त्यांची लागवड अॅबिसीनियांत झाली. नंतर त्याचा प्रसार अरबस्थानांत झाला. १६५० च्या सुमारास बाबाबुडन नांवाच्या