पान:लंकादर्शनम्.pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६७

जुने झाले म्हणजे जमीनीपासून २|३ फूट उंचीवर खोडाचीसाल त्रिकोणाकृतीत कापली जाते. कापलेल्या भागांतून रस वाहू लागतो, तो वाट्यांत धरून जमा करितात. प्रत्येक महिन्याला सुमारे १ इंच साल कापतात. चांगल्या झाडापासून दरसाल ४० पौंड रबर मिळतो.

 रस उष्णतेनें घट्ट होऊ नये, म्हणून थंडीच्या वेळी रस गोळा करण्याचे काम चालते. रस गोळाकेल्यानंतर त्यांत किंचित् अॅसँटिक अॅसिड मिश्र करितात व रसांत असलेला केरकचरा व सालींचे तुकडे काढून टाकितात. नंतर तो रस परळांत ओतून ते परळ पाण्यांत २४ तास ठेवितात. असे केले म्हणजे रवर घट्ट होतो. पुढे यंत्रानें तो दाबितात व या योगे त्यांत असलेले सर्व पाणी निघून जाते. यापुढे एका खोलीत रबराच्या वड्या शिड्यांवर ओळीने ठेवतात व तेथे धूर सोडून सर्व दारे बंद करितात. या क्रियेने रबरास काळसर रंग येतो.

 गंधकाच्या संयोगाने रबरास काठिन्य येते. प्रथमतः गंधकाच्या संयोगाने रबर कठीण करून त्याच्या 'धांवा' उपयोगांत आणित असत. पुढे "डनलाप" नांवाच्या गृहस्थाने रबराच्या 'पोकळ धांवा' करण्याची युक्ति काढली. एबोनाइट हा पदार्थ रासायनिक पद्धतीने रबरापासूनच तयार करितात. कार्यपरत्वे रबराच्या ठिकाणी निरनिराळे गुण असावे लागतात व ते गुण प्राप्त होण्यास कराव्या लागणाऱ्या क्रियाही पुष्कळच आहेत.

 रबराचे झाड हें आधुनिक जगांतील कल्पवृक्ष आहे. हा कल्पवृक्ष पाश्चात्यधनिकांनी मोठ्या काळजीने वाढविलेला आहे व त्याच्या संवर्धनास लागणारा भूपृष्ठ — विषुव वृत्तावरील प्रदेश – आपल्या ताब्यात ठेविला आहे; हा कल्पवृक्षही पाश्चात्यलक्ष्मीपुत्रांना अनेक प्रकारच्या सुखांची प्राप्ति करून देत आहे.

 रबराचे नानाविध उपयोग शब्दाने वर्णन करणे अशक्य आहे.