पान:लंकादर्शनम्.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६३

 हिंदुस्थानांत मोठ्या प्रमाणावर शेती करावयाची झाल्यास जरूरीच्या वेळी पुरेसे मजूर मिळणे कठीण पडते. मजूर मिळालेच तर त्यांना जबर वेतन द्यावे लागते व जबर वेतन देऊनही त्यांना वेळेवर कामास हजर राहावयास लावणे व त्यांजकडून पुरेसे काम करून घेणे तर जवळजवळ अशक्यच होते. गुन्हेगार लोकांच्या लहान लहान वसाहती करून त्यांना एखाद्या धनिकाच्या शेतीवर कायद्याने काम करावयास लाविले तरच मोठ्या भांडवलांवर शेतीकरणे येथे किफाइतशीर होईल.

 निसर्गाची व आधुनिक यंत्रसामुग्रीचा अनुकूलता, मजुरांचे सांनिध्य, त्यांस द्यावे लागणारे अल्प वेतन अशा कारणसमुच्चयाने चहाचा धंदा या बेटांत फार किफाइतशीर होतो. जगांतील एकंदर चहाच्या निपजी पैकीं १/७ पेक्षा जास्त चहा एकट्या सीलोनमध्ये होतो. सीलोनमधील चहांत चिनी चहा पेक्षां टॅनिन जास्त असते. पत्ती गोळाकरितांनां "कळी व दोहोंबाजूची दोन पाने" निराळीच वेचतात व त्या पासून होणारा चहा सर्वात उत्तम ( फ्लावरी ) म्हणून गणिला जातो. समुद्रसपाटी पासून चहाच्या मळ्याची उंची जितकी जास्त असेल तितका चहाला स्वाद जास्त असतो, चहाचा स्वाद नेहमी चहांत असणारा कळीचा भाग व चहाच्या मळ्याची समुद्रसपाटीपासून उंची यांवर अवलंबून असतो.

 कारखान्यांत चहा तयार झाल्यावर चहा अंबविण्याची क्रियाबरोबर झाली की नाही हे पहाण्याकरितां कारखान्याचा सेक्रेटरी प्रत्येक प्रतीच्या चहाचा थोडा चहा घेऊन तो करून पहातो व स्वाद बरोबर उतरला नसल्यास लागलीच कोणती क्रिया बिघडली ते पाहून काढतो व चूक दुरस्त करितो.

१ चहाच्या जातीः - हिरवा चहा राशियन आणि अमोरकन लोक वापरतात.