पान:लंकादर्शनम्.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५८

मळे फार थोडे आहेत, चहाच्या मळ्यांच्या भांडवलापैकी शेकडा ९० भांडवल पाश्चात्य लोकांचे आहे. सीलोनमधीलही बहुतेक मळे युरोपियन लोकांच्या मालकीचेच आहेत.

 कलकत्त्यास टी ब्रोकर्स अँसोशियनच्या कचेरींत कलकत्ता टी ट्रेडर्स अँसोशियन मार्फत हंगामाच्या दिवसांत ( जुलै ते डिसेंबर ) चहाचे लिलाव दर मंगळवारी होतात. सीलोनमध्ये चहाची देवघेव मुख्यतः कोलंबो येथे होते. लंडन येथेही चहाचे लिलाव होतात. मुंबईचा कपाशीचा भाव ज्याप्रमाणे अमेरिकेच्या न्यूयार्कच्या भावावर अवलंबून असतो त्या प्रमाणे कलकत्ता व कोलंबो येथील भाव लंडनच्या भावाप्रमाणे बदलत असतात.

 हिंदि चहाच्या निर्गतीवर १०० पौंडास ६ आणे जकात आहे. जकात सरकार वसूल करिते व वसुलाच्या उत्पन्नाची व्यवस्था इंडियन टी सेस कमिटि कलकत्ता या संस्थेमार्फत होते. जकातीचे उत्पन्न सुमारे १३ लक्ष रु. येते व यांतील बहुतेक उत्पन्न यूरोप आणि अमेरिका येथे चहाचा प्रसार वाढविण्याचे कामीं खर्च होते. चहास लागणारी खते व जमीन आणि चहास होणारे रोग इत्यादि विषयांचे शास्त्रीय संशोधन करण्याची प्रयोगशाळा आसाम मध्ये टोकलै येथे आहे.

 चहा ही मूळची आसाममध्यें सांपडणारी वनस्पति आहे. चहाला उष्ण व सर्द हवा लागते. पाऊसही भरपूर स्हणजे ७०-८० इंच असावा लागतो. झाडाची मुळे कुजू नयेत म्हणून चांगला निचरा होणारी जमीन लागते. या सर्व गोष्टींची अनुकूलता सीलोनमध्ये आहे. सुमार ६०-७० वर्षांपूर्वी सीलोनमधील उच्च पर्वतराजीवर दाट अरण्यें होती. पाश्चात्य धनिकांनी ती अरण्यें तोडून चहाचे अनेक मळे तेथे तयार केलेले आहेत.

 शंभर एकर चहाचा मळा प्रस्तुतकाळी करावयाचा म्हटल्यास त्यास साधारणतः पुढील प्रमाणे खर्च येतो.