पान:लंकादर्शनम्.pdf/5

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 नासिक येथील सुप्रसिद्ध कान्ट्रेक्टर श्रीयुत देवराव सयाजी वाघ डि . स्कूलबोर्ड मेंबर, यांनी एकदां सहज विचारले की तुह्मी रजेवर गेल्यावर काय करणार आहात? 'मी सीलोनमध्ये जाणार' असे उत्तर देतांच ते ह्मणाले की मग मीही तुमचे बरोबर येतो. नासिक डि. स्कूलबोर्ड अडमिनिस्ट्रेटिव्ह आफिसरचे मी काम करीत असतांना, श्री. वाघ यांची व माझी बरीच ओळख झालेली होती व एकमेकांना परस्परांच्या स्वभावाची पूर्ण माहिती होती. यामुळे आह्मी बरोवर जाण्याचे ठरविले. नंतर आम्ही आपली मित्रमंडळी गोळा केली व दोन मोटारलारी घेऊन निघालो.

  मोटारीस मैली ४| आणे भाडे देण्याचे आम्ही ठरविले. भांडीं, दिवे आचारी व औषधे घेऊन ता. ३० मार्च १९३३ रोजी नासिक सोडून निघालो. आमच्या मंडळींत ब्राह्मण, मराठे, खिस्ति, व मुसलमान अशी सर्व प्रकारची सुमारे ३८ मंडळी होती. दीड दोन वर्षांच्या मुलापासून तो ७५ वर्षाच्या वृद्धापर्यंत लहानथोर अशा ३८ मंडळीचा समूह घेऊन पुणे, पंढरपूर, विजापूर, बेल्लारी, कुंभकोणम्, मद्रास,पांडेचरी, तंजावर, त्रिचनापल्ली व पदुकोटा या मार्गे रामनड येथे गेलो. रामनड येथे मोटारी ठेवून आमच्यापैकी निमी माणसे रामेश्वरीं जाऊन राहिली व निमी सिलोनमध्ये गेली. सीलोनमधून परत आल्यावर सर्वजण रामेश्वरीं एकत्र झालो व तेथून रामनड येथे येऊन पुन्हा आम्ही आपल्या मोटार लारींतून दिंडिगल, कोईमतूर, उटकमंड, सैसर, बंगलोर, कोलार, भद्रावती वगैरे पाहून हरिहराहून हुबळीस आलो व तेथून बेळगांव, कोल्हापूर, सातारा या मार्गे पुण्याहून नाशिक येथे परत आलो.

 आमच्या सर्व प्रवासास माणशीं शंभर रुपये भाडे व भोजन याकारिता खर्च आला. वाटेंत कोणीही आजारी पडले नाहीं. उन्हाळ्याचे दिवस होते तरी उन्हाचा त्रास झाला नाहीं. एकंदर प्रवास अल्प खर्चात व सुखकर असाच झाला. कोणत्याही गावी गेल्यावर काय पहावयाचे हें