पान:लंकादर्शनम्.pdf/45

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
३४

मळ्यांत काम करित असणारे मजूर बहुधा तामीळच असतात. मद्रास इलाख्यांतून मजूरीकरितां आलेल्या तामिळांची संख्या सुमारे ५।६ लाख । असते. येथे मुसलमान सुमारे चार लक्ष आहेत. खिस्ती लोकांची संख्या सुमारें पांच लक्ष आहे. सिंहली लोक बहुधा बुध्द धर्माचे आहेत.

रोडिया


 रोडिया ही सीलोनमधील अस्पृश्य जात. रोडियाच्या सावलीचाही अद्याप कित्येकजण विटाळ मानतात. पूर्वी एका राजाला रोडियांनीं मनुघ्याचे मांस भक्षण करण्यास दिले व या अपराधाबद्दल तेव्हांपासून या लोकांस अत्यंत अपवित्र मानण्यात येऊ लागले अशी दंतकथा आहे. प्राचीनकाळी रोडिया स्त्रियांना कमरेच्यावरचा भाग नेहमी उघडा राखावा लागत असे. हिंदुस्थानांतील अस्पृश्याप्रमाणे रोडियांना कोणतेही सामाजिक हक्क उपभोगिता आले नाहीत असे दिसते.

 कॅडी येथील राजांच्या वेळी एखाद्या प्रतिष्ठित माणसास भयंकर शिक्षा द्यावयाची झाल्यास त्याच्या बायकोच्या तोंडांत रोडियाच्या तोंडांतील विड्याचा पीक घालीत व अशारीतीने तिला बाटवीत. पुरुषांसही अशी शिक्षा देत असत.

 याप्रमाणे उच्च कुलांतील ज्या स्त्रिया रोडियांच्या ताब्यात दिल्या त्यांपासून झालेली संतति सुरूप निपजली व यामुळे रोडियांत कित्येक पुरुष व स्त्रिया फार सुंदर आहेत.

सीलोनमधील खेडेगांव

 हिंदुस्थानांतील खेड्यापेक्षां सीलोनमधील खेडी जास्त शोभिवन्त दिसतात. प्रत्येक घराच्या भोंवतीं नारळी, पोफळी, केळी वगैरे फळझाडे, सुंदर फुलांची झाडे व भाजीपाला यांची बाग असते. घरे हिंदुस्थानांतील घराप्रमाणेच बहुधा मातीच्या कच्चा विटांची असतात. छपरावर नारळाच्या झावळ्या टाकलेल्या असतात.