पान:लंकादर्शनम्.pdf/30

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



२१

 हे देऊळ पाहिल्यावर, ब्रेझन पॅलेस, रेनुवेल्ली पॅगोडा वगैरे पहावयास वाहेर गेलो. बारा वाजेपर्यंत सर्व मुख्य मुख्य स्थाने पाहून परत आलो. रस्त्याने ठिकठिकाणी केळी मिळत. चांगली केळी २ दिडकी डझन मिळत. रस्त्याने बागाही पुष्कळ होत्या. वाटेत आह्मीं जेवणाकरितां केळीची पानेही आणिली.

 स्नानादि विधि आटोपल्यावर आह्मी स्वयंपाक केला व शाकाहारी लोक एकत्र जेवलो. बाकीचे लोक खाणावळींत जेऊन आले.

 जेवणानंतर मी पुन्हां बाहेर पडलो व तेथील ओरिएंटेल लायब्ररीतली पुस्तकें पाहिली. पुस्तकांनी भरलेली फक्त दोनच कपाटें होती व त्यांत तिपिटके, व त्यावरील टीका हेच मुख्य ग्रंथ होते. तेथे दोन भिक्ष होते त्यांस मी विचारले की, तुमचा ‘धम्मपदासारखा धार्मिक ग्रंथ जर आह्मी देवनागरी लिपीत लिहून प्रसिध्द करण्याचे मनांत आणिलें तर तुमच्या सीलोनमधील एखादा गृहस्थ ती प्रत वाचून शुध्द आहे की नाही हे ठरविण्यास मदत करू शकेल काय ? भिक्षंनी उत्तर दिले की, येथीलभिभूपैक्री कोणी हे काम करू शकणार नाहीं तुह्माला कलकत्याच्या लोकांची मदत घ्यावी लागेल. मला वाटते की माझ्या बोलण्याचा आशयच त्यांस समजला नाही किंवा समजला असल्यास निष्कारण वचनबध्द होऊन एकादे श्रमाचे काम करण्याचा प्रसंग येऊ नये असा त्यांचा हेतु असावा कारण त्या दोघां. पैकी एकास देवनागरी वाचतां येत होते.

 यानंतर त्यांना इतर कांहीं माहीती विचारल्यानंतर मी परत आलो. आमच्या बरोबरच्या लोकांना परत जाण्याची विशेष उत्सुकता वाटत होती. श्रीपाद येथे जावयाचे होते परन्तु पावसास सुरवात झाल्यामुळे तेथे जाणे अत्यंत कठीण होईल असे वाटल्यामुळे अनुराधपुरावरूनच परत हिंदुस्थानांत येण्याचे आह्मी ठरविलें. आमची मोटार सकाळीच कोलंबोला परत गेली.


  • बुद्धधर्मीयांची धर्माची प्रमाणभूत पुस्तके