पान:लंकादर्शनम्.pdf/3

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



प्रकाशकाची विज्ञप्ति

 सीलोनमधून जून १९३३ मध्ये परत आल्यावर सुमारे दोन महिन्याच्या आंतच माझे मित्र श्रीयुत नारायण गोविंद पिंगळे यांनी प्रस्तुत पुस्तक लिहून दिले. परन्तु अनेक कारणामुळे छपाईचे काम फारच दिरंगाईवर पडले. पुस्तकाचे छपाईचे काम चालले असतांना पूर्फे जितकी काळजीने तपासावयास पाहिजे होती तितका न तपासली गेल्यामुळे अशुद्धे बरीच राहिली आहेत याबद्दल मला अत्यंत वाईट वाटते. मराठी वाचकवर्ग सूज्ञपणाने मुद्रणदोघाबद्दल क्षमा करील अशी आशा आहे.

 सिंहलद्वीपांत प्रेक्षणीय स्थले पुष्कळच आहेत व त्या सर्वांचे वर्णन दिले असते तर पुस्तक फारच मोठे झाले असते. व्यापारी दृष्टीने सीलोनचे फारच मोठे महत्त्व आहे ही गोष्ट विशेषतः लक्षांत यावी याच हेतूने प्रस्तुत पुस्तक लिहिले आहे .

 कॅडी येथील सिंहली राजांचे सिंहासन परत मिळावे ह्मणून सिंहली लोकांनी चळवळ चालविली होती तिला यश येऊन सुमारे दोन महिन्यापूर्वी ते सिंहासन लंडनहून कोलंबो येथे आणून ठेवण्यात आले व मुंबई येथील एका विख्यात प्रयोग शाळेत रासायनिक पध्दतीने चहा तयार करण्यांत आला अशा दोन महत्वाच्या गोष्टी नुकत्याच घडल्या.

 प्रस्तुत पुस्तक वाचकांस पसंत पडल्यास दक्षिण हिंदुस्थान व होसोर येथील सामाजिक, आर्थिक, धार्मिक व शैक्षणिक माहिती देणारी पुस्तकें प्रसिध्द करण्याचा आमचा विचार आहे.

प्रकाशक


देवराम सयाजी वाघ


बिल्डिंग कान्ट्राक्टर, नासिक,,