पान:लंकादर्शनम्.pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



११८

 गलविहाराच्या भोवती जंगल आहें व येथें बुद्धाची ४५ फुटाची मूर्ति आहे. वाटाड्याबरोबर घेऊन ही स्थलें एकदां पाहून यावे.

कॅंडीजवळील पॅराडेनिया येथील वनस्पतींची बाग

 कॅंडीपासून सुमारे ३ मैलावर पॅराडेनिया येथें अतिशय मोठी अशी सरकारी बोटॅनिकल गार्डन आहे. बागेचे क्षेत्र १४३ एकर आहे. बाग पहावयास जावयाचे असल्यास प्रथमत: तेथील आफिसमध्ये जाऊन परवानगी घ्यावी लागते. बाग दाखविण्याकरितां एक वाटाड्या मिळतो. बाग पहाण्याकरितां फी द्यावी लागत नाहीं.

 या बागेमध्ये लवंग, वेलदोडे, जाळफळ, मिरी, सिंकोना, दालचिनी इत्यादि नाना प्रकारची उपयुक्त झाडें आहेत. तसेच नाना जातीचे ताड, फुलझाडे वगैरे अनेक प्रकारची झाडे आहेत. वनस्पतिशास्त्राचा अभ्यास करणारे विद्यार्थी व प्रोफेसर येथे येत असतात. सर्व बागेतून फिरून येण्यास कमीतकमी ४|५ तास लागतात.

 आपले हिंदुस्थानचे मरहूम एडवर्ड बादशहा यांच्या हस्ते लाविलेले एक झाड आहे; तसेच प्रस्तुतचे बादशहा पांचवे जार्ज यांच्या हस्ते लाविलेलेही एक झाड आहे. सीलोनमध्ये गेल्यानंतर एकदां या बागेत जाऊन येणे ज्ञानार्जनाचे दृष्टीने फायदेशीर आहे.

 राक्षसी बांबू ( जायंट बाम्बू ) म्हणून जी बांबूची जात आहे तो एका रात्रींत २ फूट वाढते असे डाक्टर लॉक नांवाच्या संशोधकाने १९०४ साली सप्रयोग सिद्ध केले आहे. ताडपत्राचे पान इतके मोठे असतें कीं त्या खाली २०|२५ माणसे राहूं शकतात.

 बागेतून फिरतांना विशेषतः नदीकडेला गवतांतून फिरतांना जळवांना जपावे, कित्येकदां अनेक जळवा पायाला चिकटून रक्त पिऊ लागतात. बागेमध्ये सापाची भीति फारशी नाहीं.

————°————