पान:लंकादर्शनम्.pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



११७

 देवळाच्या पूर्वेस देवळाच्या आवारांतच "ओरिएंटल लायब्ररी" अशी पाटी असून एका इमारतींत कांहीं ग्रंथ आहेत. ही लायब्ररी १|२ कपाटांचीच आहे.

 अनुराधपुर येथील पिंपळाचे झाड जगांतील ऐतिह्य वृक्षांपैकीं अत्यंत जुने असे आहे.

पोलोन्नरुवा

 अनुराधपुरापासून ४० मैलावर नैऋत्येस हे शहर आहे. अनुराधपुर येथून सीलोनची राजधानी हालल्यानंतर ती या ठिकाणी नेण्यात आली होती. या शहराचे वैभवाचा अस्त झाल्यानंतर अनुराधपुराप्रमाणे हेही गांव निबिड अरण्यांत बुडालें होते.

 सुमारे ५० वर्षापूर्वी येथे उत्खनन करून अनेक प्राचीन अवशेष बाहेर काढिलेले आहेत. या अवशेषांत नानातऱ्हेच्या मूर्ति व खोदीव काम आहे.

 भगवान् बुद्धाची निद्रित अशी ४५ फूट लांबीची एक मूर्ति येथे आहे. या मूर्तीच्या शेजारी बुद्धाचा प्रिय शिष्य आनंद याची उभी असलेली मूर्ति आहे. अजिंठा येथे अशीच बुद्धाची २५ फूट लांबीची मूर्ति २६ व्या लेण्यांत आहे. पोलोन्नरुवा येथे उत्खननाचेवेळी मोठाले डागोबा, देवळे व राजवाडे सांपडलेले आहेत व यावरून प्राचीन काळी, शिल्प, स्थापत्य वगैरे शास्त्रांत सिंहली लोकांनी किती प्रगति केली होती ते दिसून येते. बुद्ध लोकांचे हें यात्रेचे ठिकाण आहे व हजारो बुद्धधर्मीय लोक दर्शनाकरितां येत असतात. पोलन्नरुवा येथे शिरतांच पूर्वीच्या राजांचे दरबारगृह लागते जवळ प्राचीन असे शंकराचे दगडी मंदीर आहे. वटगडे नांवाची इमारत फार प्राचीन असून सुंदर आहे. गलपोत (दगडी पोथी) नांवाचा २५ टनाचा मोठा शिलाखंड आहे व त्यावर शिलालेख आहेत. जेतवनाराम नांवाचे फार मोठे बुद्धाचे देऊळ आहे व त्यांत बुद्धाच्या अनेक मूर्ति आहेत.