पान:लंकादर्शनम्.pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



११४

त्यामुळे येथे व्यापारही बराच चालतो. शाकाहारी लोकांकरितां मात्र येथे कांहींच सोय नाहीं.

 ज्यावेळी येथे उत्खनन झाले त्यावेळी २० फूट लांबीच्या दगडी डोणी सांपडल्या आहेत. यांचा उपयोग काय करीत असत ते समजणे कठीण आहे. कांहीं लोक म्हणतात की, राजांच्या हत्तीला खाणे घालण्याकरितां त्यांचा उपयोग करीत असत; कोणी ह्मणतात की, यांत भिक्षुलोक आपले कपडे रंगवीत असत; कांहीं लोक असे म्हणतात की भिक्षूना भात वाढण्याकरितां यांचा उपयोग करीत असत. अशाच तऱ्हेची एक मोठी डोण विजयानगर येथे आहे.

 या ठिकाणी प्राचीन स्नानगृहे आहेत. ती पाहून सांप्रत कोणास कांहींच आश्चर्य वाटणार नाहीं परन्तु प्राचीनकाळीं संस्कृति किती पुढे गेली होती ते या स्नानगृहावरून दिसते. बुद्धांच्या विनयपिटक ग्रंथांत यांचे वर्णन आढळते. प्राचीन विषयाच्या अभ्यासकाला ईजिप्तमधील प्राचीन स्नानगृहाशी यांची तुलना करितां येण्यासारखी आहे.

 अनुराधपुरास गेल्यावर थूपाराम, अभयगिरिडागोबा, थोलुविय विहार, वगैरे प्राचीन अवशेष पहावेत.

रुनवेल्ली पॅगोडा'

 अनुराधपुरांतील बुद्ध मंदिराच्या सुमारे १ फर्लांगावर पश्चिमेस हा पॅगोडा आहे. ही इमारत टेकडीप्रमाणे वर्तुळाकार आहे व वरती एक कळस आहे. ही विटांनी बांधलेली इमारत आहे. तिचा घेर एक हजार फूट असून उंची २७० फूट आहे. भोवतालची भिंत सध्यां पडलेली आहे. ही इमारत सांपडल्यापासून तिच्यांत पुष्कळच फेरबदल करण्यांत आलेले आहेत. या इमारतीच्या उत्तर बाजूस देऊळ वजा एक खोली आहे. तेथे दत्तुगामिनी राजाचा एक पुतळा असून तीन बुद्धाचे पुतळे आहेत. या ठिकाणी अनेक लोक येऊन उपासना करितात. दत्तुगामिनीने