पान:लंकादर्शनम्.pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११०

आहेत. येथील लेण्यांतील रंगित काम अद्याप पर्यंत नव्यासारखे दिसते आहे.

नुवारा एलिया

 हे ‘टी इस्टेटोचे'* केंद्र आहे व याची उंची ६२४० फूट उंच आहे. सर्वत्र उंच गिरिशिखरें, गिरिशिखरावर सर्व बाजूंस चहाचे पसरलेले हिरवेगार मळे व नानाप्रकारच्या वृक्षांनी आच्छादिलेलें दऱ्याखोऱ्यांचे कांठ यामुळे हे ठिकाण फारच रम्य आहे. नानाप्रकारच्या फळझाडांची व फुलझाडांची अनुपम शोभा सर्वत्र दिसते. स्वच्छ पाण्याचे वाहणारे झुळझुळ प्रवाह सर्वत्र आहेत.

 या भागांत युरोपियन मळेवाल्यांची बरीच मोठी वस्ति असल्यामुळे क्रिकेटची क्रीडागणे, टेनिसकोर्टें, गोल्फग्राउंडस यांची कमतरता कोठेचे नाहीं, येथील हवा इंग्लंडच्या हवेपेक्षाही चांगली आहे असे म्हणण्यास हरकत नाहीं. इंग्लिश लोकांना पाहिजे इतका हवेचा थंडपणा आहे पण बर्फाचा त्रास नाहीं. पर्जन्य बाराही महिने आहे पण पावसाची चिकचिक नाहीं. इंग्लंडमधील सर्व प्रकारची फळे व पुष्पें उत्तम रीतीने वाढण्यास अनुकूल अशा परिस्थिति आहे. शिवाय उष्ण प्रदेशांतील फळे व फुलेही येथे मिळू शकतात. शिकारीची सोयही या ठिकाणी चांगली आहे.

 असा हा निसर्गरमणीय प्रदेश युरोपियन लोकांनी आधुनिक शास्त्राच्या साह्याने नंदनवन बनविलेला आहे. सीलोन मधील निरनिराळ्या भागांतील लोक येथे चैनी करितां व हवा पालट करण्याकरिता येत असतात. हिंदुस्थानांतील उटकमंड, महाबळेश्वर इत्यादि ठिकाणापेक्षा हे ठिकाण फारच रम्य आहे. प्रत्येक नूतन परिणित जोडप्यास या भागांत हनिमून करितां जावेसे वाटते. बोअर युद्धाचेवेळी येथे शेकडो बोअर कैद्यांस ठेवण्यात आले होते. हिंदुस्थानातील अनेक युरोपियन आफिसर्स व व्यापारीही तेथे नेहमीं जात असतात.

* चहाचे मळे