पान:लंकादर्शनम्.pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



९८

कंगाल असे मजूर दिसत! मजुरांच्या जवळ संसाराचे सामानही फारच अल्प असे. त्यांच्या बरोबर असणारी मुलें खुजी व रोगट दिसत. सध्या व्यापार मंदीमुळे सर्व ठिकाणाहून मजूर स्वदेशी परत येत आहेत व त्यांची स्थिति फारच हलाखीची झालेली दिसते.

 भौतिक शिक्षण- प्राथमिक शिक्षणाचा प्रसार सीलोनमध्ये चांगलाच झालेला आहे. सीलोनमध्ये बुद्धधर्म प्रचलित असल्यामुळे इंग्लिश अमदानीपूर्वी तेथे बुद्धविहारांची संख्या फारच मोठी होती व त्या विहारांतून बुद्धभिक्षु प्राथमिक शिक्षणाचे कार्य करीत, यामुळे सिलोनमध्ये साक्षरतेचा प्रसार बराच झालेला होता. ज्या ज्या देशांत बुद्धधर्म प्रचलित होता किंवा आहे तेथे तेथे साक्षरतेचा प्रसार जास्त आहे. इंग्लिश अमदानीनंतर हिंदुस्थानांतील शाळा खात्यासारखे शाळाखाते तेथेही सुरू झाले व त्यामुळेही साक्षरता वाढली. सीलोनचा वाढता व्यापार हाही साक्षरतेच्या प्रसाराला एकप्रकारे उपकारक झाला. पुरुषांमध्ये शेंकडा ७० लोक साक्षर आहेत. स्त्रियांमध्येही साक्षरतेचे प्रमाण बरेच मोठे आहे. प्राथामिक शाळांच्या इमारती बहुतेक ठिकाणी चांगल्या आहेत. सुमारे शंभर ते हजार विद्यार्थ्यास शिक्षण देता येईल एवढ्या शाळांच्या इमारती आहेत. प्राथामिक शाळांत शिक्षणोपयोगी साहित्य पुष्कळ असते. प्रत्येक शाळेला बाग बहुधा आहेच. प्राथमिक शाळांतून इंग्रजी शिकविण्याची सोय असते. मुलगा तिसऱ्या इयत्तेत गेला की, त्यास इंग्रजी शिकावे लागते. मद्रास इलाख्यांतही इंग्रजी शिक्षणाची सुरुवात प्राथमिक शाळांतच होते. यामुळे बहुतेक शिक्षित लोकांस थोडेफार इंग्रजी समजते. नऊ दहा वर्षांची मुले इंग्रजी कितपत जाणतात हे पहाण्याकरितां मी अनेक मुलांबरोबर संभाषण केलें, व त्यावरून सिंहली मुलांना इंग्रजी भाषेचे ज्ञान चांगल्या तऱ्हेने प्राप्त झालेले असते असे माझे मत झालें. सिंहलद्वीपांत प्राथमिक शिक्षण सक्तीचे आहे. माध्यमिक शिक्षणाकरितां मिडलस्कूल्स् व हायस्कूल्सही बरीच आहेत.