पान:लंकादर्शनम्.pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९५

व याची वस्ति बहुतेक सर्व पर्वतावर आहे. नद्यांमधून वीस वीस फूट, लांबीच्या सुसरी आहेत. मोत्ये सांपडतात तेथील समुद्रभागांत शार्क मासे बरेच आहेत.

 दाट जंगलामध्ये हत्तींचे कळप राहातात. कधीकधी एका कळपांत १०० चे वरही हत्ती असतात. कधीकधी हे एखाद्या खेड्याजवळ येऊन शेतीचे भयंकर नुकसान करितात. अशावेळी या कळपांचे मागे लागून कित्येक हत्ती पकडण्यांत येतात. हा हत्ती पकडण्याचा प्रसंग इतका बहारीचा असतो व त्यावेळी ही गम्मत पहणारांचीही इतकी गर्दी होते कीं, ज्याने हा रोमांचकारी प्रसंग प्रत्यक्ष डोळ्याने पाहिला असेल त्याच्या अंतःचक्षूपुढून तो जन्मभर जाणार नाहीं. हत्तींना पकडण्याचा प्रसंग पहाण्यास परवानगी काढावी लागते.

मजुरांची स्थिति.

 पाश्चात्य लोकांनी आफ्रिका, अमेरिका व भूमध्यसमुद्रांतील बेटें या ठिकाणी वसाहत करावयास सुरवात केल्यानंतर त्यांना मजुरांची वाण पडू लागली. मजूर असल्याशिवाय फारेस्ट तोडून जमीनी तयार करणे व शेती करणे अशक्यच होते.

 कांही ठिकाणी ही कामें प्रथमतः गुलामाकडून करून घेत असत. नंतर हिंदुस्थानसारख्या देशांतून कांहीं मुदतीने मजूर परदेशी जाऊ लागले ब विशेषतः मॉरिशस, नाताळ, फिजी, कॅनडा इकडे हजारो मजूर दरसाल कामाकरितां बाहेर जातात. या मुदतबंदि पद्धतीत पुढील गोष्टींचा मुख्यतः समावेश होई.

  (अ) मुदत संपेपर्यंत मजुराला स्वतंत्रपणे रहातां येत नसे.

  (ब) मजुर ही मालकाची मालमत्ता समजली जाई व मालकाची नौकरी करण्यास मजूर बांधलेला असे व त्याचे मजूरीचे दरही ठरलेले असत.