पान:लंकादर्शनम्.pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९४

सीलोनमध्ये गेलों, त्यावेळी ५६ खाणी बंद झाल्यावद्दल व जपानची मागणी कमी झाल्याबद्दल तेथील वर्तमानपत्रांतून चर्च चाललेली होती. पॉबॉगोच्या खाणी पहावयाच्या असल्यास "मिरिगामाकडे" जावें. कोलंबो ते गेलीमधील दाक्षिण पट्यांतही बऱ्याच खाणी आहेत. कॅंडी व मस्केलिवा भागांतही खाणी आहेत. खडकांमधून ६ ते १२ फूट रुंदीच्या शिरा गेलेल्या सांपडतात. खाणीची खोली ५०० फूटापेक्षां जास्त असत नाहीं. अद्यापपर्यंत जुन्या पद्धतीने हातांत दिवा घेऊन दोराच्या साह्याने खाली उतरून ही धातू काढितात.

शिकार.

 सीलोनमध्ये डोंगराळ व जंगलाने व्यापलेला भाग बराच असल्यामुळे शिकारीची सोय चांगली आहे. नोव्हेंबर ते जूनचे आरंभापर्यंत शोकी लोक शिकारीकरितां येथे जात असतात.

 सीलोनमध्ये बंदरावर पाय ठेवतांच जवळ असलेली हत्यारे व दारुगोळा कस्टम अधिकाऱ्यांस दाखवावा लागतो, व बंदुक वापरण्याबद्दलची फी भरावी लागते. फीचा आकार बंदुकीची जात व आकार यावरून ठरविलेला आहे. शिकरिच्या परवानगीस परकीयांस ३०० रुपये पडतात. हत्तीची शिकार करण्यास स्पेशल परवाना लागतो.

 सीलोनमध्ये रानटी रेडे फार आहेत व ते कधी कधी रेल्वे लाइनवरही जाऊन बसतात. गाडी आली तरी दूर न जाण्याइतका उद्दामपणा करून प्राणास मुकतात. तथापि रेड्याची शिकार करण्यास परवानगी मिळत नाहीं. रानडुकर सर्वत्र आहे. तसेच निरनिराळ्या तऱ्हेचे हरीण व पक्षी हेही पुष्कळच आहेत. शिकारी लोकांचे असे मत आहे की, जगांत शिकारीकरितां अत्युत्तम असे जे प्रदेश आहेत त्यांत सीलोन हा एक आहे.

 सीलोनमध्ये वाघही आहेत. चांगला वाघ ७ फूट लांबीचा सांपडतो.