पान:लंकादर्शनम्.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



९१

हिरे खाणींतून काढल्यावर त्यांनां तेज असे फारच कमी असते. रत्नांना पैलू पाडून साफ केले ह्मणजे प्रकाशाचे वक्रीभवनाने हिऱ्याचे तेज वाढते. हिरा कापणे व पैलू पाडणे हे अत्यंत कुशलतेचे काम आहे. अँटवर्प व अॅमस्टरडॅम या ठिकाणी उत्तम पैलू पाडणारे कुशल कारागिर आहेत व त्यांचे * मोठाले कारखाने आहेत. हे कारखानदार लोकही हिऱ्यांच्या निगतीवर नियंत्रण ठेवितात.

 अलीकडे "परफेक्ट कट" ह्मणून ज्या पद्धतीस नांव दिले आहे त्या पद्धतीने हिरा कापला ह्मणजे त्याला वरच्या बाजूस ३३ व खाली २५ असे एकंदर ५८ पृष्ठभाग (Facets) असतात. रत्नाच्या मध्यास कैवरम् म्हणतात. रत्नाची उंची, पृष्ठभाग वगैरेचे एकमेकांशी असणारे प्रमाण ठरलेले असते.

 सीलोनमध्ये गेल्यावर ज्याला रत्नाची पारख नाहीं अशा माणसाने रत्ने खरेदी करू नयेत कारण अनेक लोक खोटे खडे विक्रीत असतात. रत्ने घ्यावयाचीच झाल्यास चांगत्या कंपनीकडे तरी जावे. एन्. गोपाळदास अँड को, नांवाच्या कंपनीची दुकानें त्रिचनापाल्ली, तंजावर वगैरे ठिकाणी आहेत, तेथे चांगला माल मिळतो. तसेच कोलंबो येथे कॉटेज इंडस्ट्रीज सोसायटि लिमिटेड, मकन मार्कर वगैरे प्रसिद्ध दुकाने आहेत. सीलोनमधून हिंदुस्थानांत रत्ने आणावयाची झाल्यास शेकडा ३० जकात पडते.


  * हिंदुस्थानांत दरसाल एक दशलक्ष पौंड किंमतीची आफ्रिकन रत्ने येतात. आफ्रिकेंतून ही रत्ने अँटवर्पला जातात व तेथून हिंदुस्थानांत येतात. या द्राविडी व्यापारी पद्धतीने जकात, व्याज व इन्शुअरन्स यापायीं हिंदुस्थानचे बरेच मोठे नुकसान होते. शिवाय पैलू पाडण्याची कारागिरी शिकण्याचा तरुणांचा मार्गही बंद झाला आहे.