पान:लंकादर्शनम्.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८८

बारीक करणे, स्नानास ऊनपाणी थोडे घेणे हे धन संचयाचे मार्ग आहेत या दृढ समजुतीने वागणारे ब्राह्मण आजही थोडे थोडके आहेत असे नाही. यामुळे सीलोन सारख्या लहान बेटांत अक्षय्य वहाणारे संपत्तिचे झरे किती मोठाले आहेत व त्यांचा उपभोग इतरलोक कसा घेत आहेत याची कल्पनाही भारतीयांस येत नाहीं.

 मोत्याचे शिपले गुंड्याकरितां, शोभेकरितां व हिंदुस्थानांत शौक्तिक भस्माकरितां तर यूरोपमध्ये कल्केरियाकार्ब या औषधांकरितां सीलोनहून निर्गत होतात. सीलोनच्या किनाऱ्या जवळ नाना प्रकारचे शंख सांपडतात. हिंदुस्थानांत शंखाची कोणत्याही तऱ्हेनें वाण नसतांना या देशांत शंखांची आयात होते. शंख कलकत्त्याकडून साफसूफ होऊन पुन्हा विक्री करितां रामेश्वरी येतात. रामेश्वराचे देवळांत शंख व कवड्या विक्रेत्या मुसलमानांची अनेक दुकाने आहेत. कुंकू हिंदूस्त्रियांनी लावावे, व ते मुसलमानांनीं विकावे तद्वत् शंखाची पूजा हिंदूनी करावी व शंखाचा व्यापार करून मसलमानांनीं नफा मिळवावा ही गोष्ट रामेश्वरीं स्पष्टपणे कळते. उत्तम शंखास किंमतही पुष्कळच पडते, चांगल्या दक्षिणावर्त शंखास चारशे ते पांचशे रुपये पडतात.

रत्नें

 प्राचीन काळीं दक्षिणहिंदुस्थानांत रत्नांच्या खाणी पुष्कळच होत्या व तेथूनच हिऱ्यांचा पुरवठा सर्व जगास होई. या खाणींचा मक्ता दिलेला असे व २५ कॅरटपेक्षा जास्त वजनाचे हिरे राजास द्यावे लागत. चंद्रगिरीच्या राजाजवळ १६१४ च्या सुमारास हिऱ्यांनी भरलेल्या तीन मोठाल्या पेट्या होत्या.

 पृथ्वीचा जो भाग अत्यंत प्रचिन असेल त्याठिकाणी रत्नांच्या खाणी असतात व ज्या ठिकाणीं भूकंपाने नवीन पर्वत उत्पन्न झाले असतील त्या ठिकाणी तेल आणि कोळसा सांपडतो असा भूगर्भशास्त्राचा नियम आहे.