पान:लंकादर्शनम्.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



८६

दाट थराचे बनलेले असते. शिंपल्यांतून मोती बाहेर काढल्यावर बारीक सामत्याने त्यास भोक पाडतात. सीलोनच्या किनाऱ्याजवळ असे आढळून आले आहे की, मोती करणारे कालव आपलें स्थान सोडून जातात. डच लोकांच्या ताब्यांत हे बेट असतांना एकदां २७ वर्षे पर्यंत तेथील कालव नाहींसे झाले होते. कालव सरासरी पांच वर्षांचा झाला म्हणजे मोती तयार करितो.

 हिंदुस्थानांत कराची जवळही थोडी मोतीं सांपडतात. इराणचे आखात, आफ्रिकेचा किनारा, कॅलिफोर्नियाचे आखात, पनामाचा उपसागर, आस्ट्रेलियाचा किनारा इत्यादि अनेक ठिकाणीं मोतीं सांपडते. चीनमध्ये कांहीं नद्यांतही मोतीं सांपडते. अर्वाचीन काळी, शास्त्रीय शोधांमुळे समुद्र तळाशी गेल्यावर तेथे बराच वेळ काम करितां यावे व जलचर प्राण्यांमुळे त्रास होऊ नये याकरितां लागणाच्या अनेक साधनांची जोड पानबुड्यास देतां येते.

 कालव पाळून त्याच्याकडून मोती तयार करवून घेण्याचे काम चिनीलोक १३ व्या शतकांत करीत असत व हे काम मोठाल्या नद्यांतन चाले. चिनीलोक बुद्धाची लहानशी प्रतिमा शिंपल्यांत घालीत व पुढे या प्रतिमेवर मौक्तिक रसाचे थर वसले म्हणजे "बुद्धाची भूर्ति आंत असलेले मोती" तयार होई. अशा मोत्याला किंमतहीं फार येई. जंक्विन् नांवाच्या युरोपियन गहस्थाने १६८० च्या सुमारास अशीच मोती प्रथमतः यूरोपमध्ये बनविली होती. इताली व जर्मनी येथे हा व्यापार कमी अधिक प्रमाणाने चाले. अलीकडे जपानी शास्त्रज्ञांनी या कलेचा उत्तम अभ्यास करून अतीशय मोठ्या प्रमाणावर मोत्यांची पैदास केली आहे व हिंदुस्थानच्या सर्व लहान मोठ्या शहरांतून तीं मोती "कलचर्ड पर्ल्स" म्हणून विकली जातात. व अशा तऱ्हेने दरसाल कोट्यवाध रुपये हिंदुस्थानांतून परदेशी जातात.

 वेस्ट इंडीज जवळ कांहीं शंखांत गुलाबी रंगाची मोतीं सांपडतात.