Jump to content

पान:रूप पालटू शिक्षणाचे (Roop Paltu Shikshanache).pdf/९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट व मध्यंतर उद्दिष्टे एवढी व्यापक आहेत की त्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करायला हवेत. निरंतर शिक्षण चालू असणे ही स्थिती सर्वात उत्तम असे प्रबोधिनी मानते. सद्य:स्थितीत औपचारिक शिक्षणाचा कालावधी मोठा होत चालला आहे व उपजीविकेसाठी प्रयत्न सुरू होण्याचा टप्पा लांबणीवर पडतो आहे. परंतु प्राथमिक शिक्षणानंतर उपजीविकेसाठी काम व शिक्षण हे जोडीने चालले तर अधिक उत्तम, अशी प्रबोधिनीतील मांडणी आहे.
अध्यापन पद्धती
 या मांडणीच्या आधारे प्रबोधिनीमध्ये सर्वप्रथम जी अध्यापन पद्धती विकसित होत गेली ती बुद्धिमान विद्यार्थ्यांसाठी. जवळ जवळ पहिली पंधरा वर्षे ज्ञान प्रबोधिनीतले अध्यापनाचे प्रयोग बुद्धिमान विद्याथ्र्यासाठी झाले. त्यानंतरच्या पाच वर्षांत प्रथम पुण्यातील क्रीडा केंद्रांवर, नंतर शिवापूरसारख्या ग्रामीण भागात व त्यानंतर निगडीसारख्या नवनगरात सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी प्रबोधिनीचे शिक्षणकार्य सुरू झाले. त्यानंतर दहा वर्षांनी सोलापूर व साळुबे या अनुक्रमे शहरी व ग्रामीण भागात त्याचीच आवृत्ती झाली. स्थानिक गरजेप्रमाणे अध्यापनाचा वेग व टप्पे कमी-जास्त झाले तरी औपचारिक शिक्षणामध्ये अध्यापन पद्धती कशी असायला हवी याचा एक वेगळा नमुना प्रबोधिनीमध्ये निश्चित तयार झाला आहे. त्याची सूत्रे विशेष बुद्धीच्या आणि सर्वसामान्य बुद्धीच्या अशा सर्वच विद्याथ्र्यांना लागू आहेत. त्यामुळेच बौद्धिक विकासासाठी औपचारिक शिक्षणाचा विचार करताना प्रबोधिनीतील अध्यापन पद्धती समजून घेण्यासाठी अध्यापनाचा परिणाम काय असला पाहिजे हे आधी निश्चित केले पाहिजे.
अध्यापनाचा परिणाम
 विद्यार्थ्यांना माहितीचे गड्डे करायचे नसून, उपलब्ध माहितीच्या आधारे नवीन ज्ञानाची निर्मिती करण्यासाठी, त्यांना सक्षम बनवायचे आहे. हा अध्यापनाचा हेतू मानला तर ज्ञानाचे उपायोजन कसे करायचे व ज्ञानाची निर्मिती कशी करायची हे अध्यापनाचे दिशादर्शक सूत्र मानले पाहिजे. काही माहिती स्वत:बरोबर घेऊन विद्यार्थी वर्गात येतात. वर्गाबाहेर पडताना ते फक्त आणखी माहिती घेऊन बाहेर पडले असे होऊन चालणार नाही. असलेल्या माहितीचा उपयोग करण्याची दृष्टी मिळविण्यासाठी आणि कौशल्ये शिकण्यासाठी ते वर्गात येतात असे मानले पाहिजे. कोणती माहिती अजून मिळवायला हवी हे ओळखण्याचे कौशल्य शिकण्यासाठी ते वर्गात येतात असे मानले पाहिजे. त्यामुळे एका ज्ञानशाखेतील सर्वज्ञता' असाच अध्यापनाचा परिणाम अपेक्षित धरून चालणार नाही. ज्ञानाच्या उपायोजनामध्ये बहुशास्त्रीय (Multi-disciplinary)



रूप पालटू शिक्षणाचे (३)