पान:रूप पालटू शिक्षणाचे (Roop Paltu Shikshanache).pdf/८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शिक्षणाच्या तात्कालिक व मध्यंतर उद्दिष्टांसाठी प्रयत्न चालू असताना अंतिम उद्दिष्टाचा विसर पडू नये यासाठी व्यक्तीच्या शिक्षणात उपासनेचे महत्त्वाचे स्थान आहे, असे प्रबोधिनी मानते.
शिक्षणाचे मध्यंतर व तात्कालिक उद्दिष्ट
 अंतिम उद्दिष्ट अनेक पिढ्यांच्या प्रयत्नांची दिशा दाखवणारे असते, तर मध्यंतर उद्दिष्ट एका पिढीच्या प्रयत्नांची दिशा दाखवणारे असते. दिव्यत्वाचे प्रकटीकरण होत असताना समाजहित, मानवतेचे हित यांचा विसर पडता कामा नये. म्हणून समाज, राष्ट्र व मानवतेबद्दल आस्था निर्माण करणे हे शिक्षणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणून स्वीकारले पाहिजे. राष्ट्रहिताबद्दल आस्था निर्माण होण्यासाठी सर्व बौद्धिक विषयांच्या (पाठ्यक्रमातील विषयांच्या) अभ्यासातून राष्ट्राच्या मध्यवर्ती प्रश्नांची नुसती जाण येणे पुरेसे नाही. हे देशप्रश्न सोडविण्यासाठी स्वत: प्रयत्न करण्याची प्रेरणा शिक्षणातून मिळायला पाहिजे. राष्ट्रहिताविषयी आस्था, राष्ट्रीय प्रश्नांची जाण व ते प्रश्न सोडविण्यासाठी प्रेरणा निर्माण करणे हे शिक्षणाचे मध्यंतर उद्दिष्ट म्हणून प्रबोधिनीने स्वीकारले आहे.
 उपजीविकेसाठी आवश्यक कौशल्य शिकणे; कला, शास्त्रे यांचे ज्ञान मिळविणे; मोकळ्या वेळेचा सदुपयोग करायला शिकणे: समाजोपयोगी सवयी बाणविणे ही सर्व अंतिम वे मध्यंतर उद्दिष्टांच्या प्रकाशात बघावयाची तात्कालिक उद्दिष्टे आहेत.
शिक्षणामधील गृहीते व भूमिका
 प्रत्येक व्यक्तीची शरीर संपदा, बुद्धिमत्ता व हृदयगुण यांमध्ये प्रयत्न व सरावाने सुधारणा होऊ शकते हे शिक्षणातले मूलभूत गृहीत आहे. शरीर, मन आणि बुद्धीचा विकास अनेक ठिकाणी, वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये होत असतो. त्यामुळे या विकासाचे प्रयत्न फक्त शाळेत करायचे असतात ही कल्पना अपुरी आहे. घर, शाळा, युवक संघटना आणि उर्वरित सामाजिक पर्यावरण या चारही घटकांद्वारे शिक्षण होत असते अशी प्रबोधिनीची भूमिका आहे. सध्याच्या काळात बौद्धिक शिक्षण मुख्यत: शाळेमध्ये तर शारीरिक, भावनिक व प्रेरणात्मक शिक्षण मुख्यतः युवक संघटनेमध्ये होऊ शकते. परंतु या प्रयत्नांवर घरचा आणि उर्वरित सामाजिक वातावरणाचा प्रभाव पडतच असतो. त्यामुळे पालक, शिक्षक, युवक संघटनेचे चालक आणि समाजाचे धुरीण या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांचा परिणाम म्हणून शिक्षण होत असते.



(२) रूप पालटू शिक्षणाचे