पान:रूप पालटू शिक्षणाचे (Roop Paltu Shikshanache).pdf/६४

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 प्रबोधकांची मनोगते
 "इथे येण्यापूर्वी का यायचे, काय करायचे माहीत नव्हते. शाळा खूप मोठी टुमदार असेल असे वाटले होते. शाळा व मुलांच्या झोपड्या पाहून धक्काच बसला.
 गरीबी म्हणजे काय ? हे जवळून न्याहाळता आले. आम्हांला एवढ्या छोट्या, दाटीवाटीच्या घरात राहायची सवय नसल्यामुळे आत गेल्यावर कसेतरीच वाटले. पण या लोकांची गायी-गुरे दाराशीच असतात. या लोकांनी पशुंनाही घरातीलच एक घटक मानले आहे.
 या लोकांनी आमचं खूप आदरातिथ्य केलं. त्यांचं दुसऱ्याला सुख देणारं मन पाहून श्रीमंतांच्या स्वार्थी व तुसड्या स्वभावाचा राग आला. ही मुलं गरीब असली तरी नाजूक मनाची, हळवी, कोवळी, निरागस व खेळकर आहेत."

-अभिजीत डोंगरे


 “आपल्या बोलण्याचा अर्थ त्यांना कळेल का ? काल लताने ॐ का घातला असे विचारले. उत्तर काय द्यायचे हे कळतच नव्हते. रूमवर आल्यावर ताईला विचारलं. ताईने व्यवस्थित समजून सांगितल्यावर कळले. सोप्या भाषेत कसं सांगता येईल ते लक्षात आलं.
 लहान मुलांना शिकवताना पेशन्सची गरज असते. आपले शिक्षक आपल्याला कसं शिकवत असतील ? वर्गात त्रास द्यायचं कमी करायला हवं."

- दीप्ती देवधर


 “अंकुश ज्या परिस्थितीत राहतो ते पाहून आपण खूपच आरामात राहतो, उगाच छोट्या गोष्टींसाठी रडतो असे वाटते."

- केतकी बारटक्के


 “या मुलांचा दिनक्रम पाहून धक्काच बसला. मोकळा वेळ माहीतच नाही. सारखे कामच असते. घर आवरणे, पाणी भरणे, मोठ्यांना मदत करणे. शिवाय लहान भावंडे कडेवर असतातच. पुस्तकापेक्षा परिस्थिती खूप काही शिकवते त्यांना. जबाबदारीची व्यवस्थित जाणीव त्यांना आहे."

- रश्मी काळे


निरीक्षणे व परिणाम
 प्रबोधकांच्या मनोगतांवरून त्यांच्या जाणिवा-अनुभव यांत भर पडते हे जरी खरे असले तरी उपक्रमात त्यांना अनेकदा अडचणींनाही सामोरे जावे लागते. कधी या अडचणी छोट्या असतात किंवा मोठ्याही. अर्थात त्याचे छोटे-मोठेपण हे आपल्या(५८)रूप पालटू शिक्षणाचे