दिनक्रमातील प्रत्येक उपक्रमातील सहभाग हा प्रबोधकांच्या प्रशिक्षणाचा अन्
अनुभवाचा भाग असतो. प्रबोधिनीत आपल्यावर होणारे संस्कार इतरांपर्यंत
पोहोचण्यासाठी जी धडपड करावी लागते ती बरेच काही शिकवून जाते.
१) गटाचे नेतृत्व करणे- आपल्यापेक्षा छोट्या वयाच्या, इयत्तेच्या मुलांना
गोळा करणे, त्यांना वेगवेगळ्या गोष्टी शिकवणे, त्यांच्याकडून करवून घेणे आणि हे
करताना मित्रत्वाचे नातेही ठेवणे ही महत्त्वाची गोष्ट प्रबोधक शिकत असतात.
संयतपणे वागत गटाचे नेतृत्व करणे यातून नकळत घडत जाते.
२) निरीक्षण- रोज संध्याकाळी निवासी मुख्याध्यापक, प्रेरक व प्रबोधकांची
रात्री एकत्र बैठक असते. दिवसभराच्या एकंदर कामाचा आढावा या बैठकीत घेतला
जातो, दुसऱ्या दिवशीचे नियोजनही केले जाते.
या आढावा व नियोजनासाठी विद्यार्थ्यांची वैयक्तिक निरीक्षणे ठेवणे, त्या
निरीक्षणांची लेखी नोंद ठेवणे, त्यावर चर्चा करून दुसऱ्या दिवशी उपाययोजना करणे
इ. गोष्टी प्रबोधकांना कराव्या लागतात.
३) नियोजन - आपण करणार असलेल्या कामांची माहिती घेणे, पूर्ववाचन
करणे, त्या तीन दिवसांमध्ये ते काम पार पाडणे प्रबोधकांना करावे लागते. यासाठी
नियोजन असणे गरजेचे असते. हे नियोजन करणे प्रबोधक शिकतात.
परिस्थिती / वातावरण
आपले बहुतेक सर्व प्रबोधक मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय गटातील
असतात. त्यामुळे देशातील अन्य लोकांची परिस्थिती कशी असते हे अनुभवणे खूप
महत्त्वाचे असते. गरिबी कशी असते, लोक झोपड्यांमध्ये कसे राहतात, त्यांचे जेवण
कसे असते, दिवसभर पालक घरी नसताना मुले कशी राहतात, घरातील सर्व कामे ही
छोटी मुले कशी करतात, त्यांच्या आसपासचे वातावरण, त्यांच्यावर होणारे संस्कार हे
सगळे प्रत्यक्षात पाहून, अनुभवून, एक वेगळेच विश्व त्यांच्या डोळ्यापुढे येते.
अभ्यासिकेनंतर संध्याकाळी मुख्याध्यापक जेव्हा पालक संपर्कासाठी जातात
तेव्हा प्रबोधकही त्यांच्या बरोबर असतात. पालकांशी गप्पा, विद्यार्थ्यांबरोबर गप्पा
यांतून या लोकांच्या आर्थिक-सामाजिक परिस्थितीचे वास्तव भान येते. आपली
आर्थिक परिस्थिती,उपलब्ध साधने, सोयी-सुविधा, वातावरण या सर्वांची नकळत
तुलना सुरू होते.
साखरशाळेतील आपल्यापेक्षा लहान असणाऱ्या मुलांची कष्टाळू वृत्ती, जिद्द,
कमी आर्थिक परिस्थितीतही समाधान मानण्याची वृत्ती प्रबोधकांना खूप काही
शिकवून जाते.
रूप पालटू शिक्षणाचे(५७)