पान:रूप पालटू शिक्षणाचे (Roop Paltu Shikshanache).pdf/६२

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

चित्रकला, खेळ व अभ्यासविषय या सर्वच गोष्टींतील पूर्वज्ञान लक्षात घेऊन त्यांना योग्य ते प्रशिक्षण दिले जाते, त्यांची तयारी करून घेतली जाते. प्रबोधिनीत प्रबोधकांनी प्रकल्प, सहाध्यायदिन, स्वाध्याय कौशल्ये, गटकार्य इ. अनुभव घेतलेले असतात. हे सर्व अनुभव साखरशाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रेरक- प्रबोधकांना प्रशिक्षण दिले जाते. वरील सर्व विषयांपैकी जे त्यांना ज्ञात आहेत त्यांचा सराव घेणे, माहीत नसलेल्या विषयांबद्दल प्रशिक्षण देणे इ. चा समावेश असतो.
 अर्थात प्रशिक्षणाबरोबर प्रबोधकांना पूर्वतयारीही करावी लागते. शालेय विषय तर ते समजून घेतातच, शिवाय गाणी, गोष्टी गोळा करणे, वर्गातील जाऊन आलेल्या गटाशी चर्चा करणे इ. ही ते करत असतात. शिवाय विद्यार्थ्यांशी बोलताना, शिकवताना स्वत:चे संभाषण कौशल्य वापरत असतात.
 मुलांना आंघोळी घालताना, वेणीफणी करताना, औषधपाणी करताना, संध्याकाळी खेळताना, कधी भटकायच्या कार्यक्रमात ते मुलांना बोलते करत असतात. त्यांची करमणूक होत आहे याचे भान ठेवून वेगवेगळ्या गोष्टी सुचवतात, माहिती देतात, मुलांमध्ये स्वच्छतेच्या संस्कारापासून राष्ट्रभक्ती, स्वाभिमान, समता, बंधुभाव, चांगल्या वाईटाची समज, कृतीप्रवणता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यातील कल्पनाशक्ती वाढविण्याचा प्रयत्न करतात. मुलांची व प्रबोधकांची यातून भावनिक जवळीक साधली जाते. सतत एकत्र राहून, एकाच प्रकारच्या संस्कारांचे ग्रहण करत असताना, सामाजिक एकात्मतेचाही धागा बळकट केला जातो. प्रबोधक व मुलांचा सततचा संपर्क हा शाळेतील यशाचा महत्त्वाचा भाग आहे. प्रबोधकांचे मित्रत्व, त्यांचे संपर्क सातत्य आणि निश्चित संस्कार या तीन गोष्टींचे मुलांच्या विकासातील स्थान, पडसरे व साखरशाळा या दोन्ही प्रयोगांतून निश्चित झाले आहे.
हेतू व कार्यपद्धती
 १०० दिवसांच्या शाळेतील मुलांबरोबरच प्रबोधकांच्याही वैयक्तिक विकासासाठी हा सहभाग अत्यंत आवश्यक वाटतो. मुलांच्या शैक्षणिक, मानसिक, शारीरिक वाढीमध्ये प्रबोधकांचा जसा फार महत्त्वाचा वाटा असतो तसाच प्रबोधकांच्या सामाजिक जाणीवा वाढण्यासाठी, त्याचे भान राहण्यासाठी या उपक्रमाचाही महत्त्वाचा वाटा आहे.
 प्रबोधिनीमध्ये समाजसेवा ह्या विषयांसाठी वेगळ्या तासिकांची सोय नाही, किंबहुना असे वेगळे तास असण्याची आवश्यकता वाटत नाही. विविध उपक्रमांमधील सहभागातून, ज्येष्ठांच्या संपर्कातून हा 'देशस्थितीचा अभ्यास' चालू असतो.

(५६)रूप पालटू शिक्षणाचे