पान:रूप पालटू शिक्षणाचे (Roop Paltu Shikshanache).pdf/५९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

विद्यार्थ्यांसाठी वाचन, लेखन, अंकगणित, आरोग्य, स्वच्छता, व्यायाम तर प्रेरक, प्रबोधक आणि शिक्षक या गटासाठी संस्कार, करमणूक व एकात्मता असा विचार करून त्याप्रमाणे नियोजन व कार्यवाही केली जाते.
 हे विद्यार्थी साखरशाळेत चारच महिने असतात. त्यामुळे शासनमान्य शाळेतील अभ्यासक्रमच त्यांना शिकवावा लागतो. पण अभ्यासेतर अनेक गोष्टींतूनही विद्यार्थी सतत काहीतरी शिकत असतात. प्रकल्प, सहाध्यायदिन, साहस सहली इ. चे नियोजन त्यांच्या वेळापत्रकातच केले जाते. परिसर अभ्यास त्यांना परिसरात फिरूनच शिकविला जातो. शिवाय वक्तृत्व, कथाकथन, नाट्य हे धाडस, आत्मविश्वास मिळवून देणाऱ्या अभिव्यक्तीच्या प्रकारांचे त्यांच्या परिपाठाच्या वेळीच नियोजन केलेले असते. अगदी बालवाडीपासूनचे विद्यार्थी यात सहभागी होत असतात.
शिक्षक रचना
 ह्या सर्व गोष्टी यशस्वीपणे होण्यासाठी, उत्तम होण्यासाठी प्रयत्न करणारी महत्त्वाची व्यक्ती म्हणजे शिक्षक. साखरशाळेतील शिक्षक हे स्थानिकच निवडले जातात. ग्रामीण पार्श्वभूमी असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मिसळायला कुठलीही अडचण येत नाही. हे अध्यापक शिक्षणशास्त्रातले पदवीधर नाहीत. आठवी ते पदवीधर असणाऱ्या या शिक्षकांना प्रबोधिनीत प्रशिक्षित केले जाते. विद्यार्थ्यांना शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमाबरोबर, अध्यापन प्रक्रिया, अध्यापन कौशल्ये, मानसशास्त्र या विषयांचा समावेश असतो. बहुतेक शाळा एकशिक्षकी असल्यामुळे बहुवर्गीय व बहुश्रेणी अध्यापन करावे लागते. अशा वेळी अध्ययन व मूल्यमापन करण्यासाठी शिक्षकांना आणखी काही व्यक्तींची आवश्यकता भासते. शिक्षकांच्या मदतीसाठी प्रबोधिनीतून प्रेरक म्हणून महाविद्यालयीन गटातील युवक-युवतींना व इयत्ता आठवी-नववीतील विद्यार्थ्यांना प्रबोधक म्हणून पाठविले जाते.
प्रशालेतील विद्यार्थ्यांचा सहभाग
 १०० दिवसांच्या शाळेतही मुलांवरील वेगवेगळ्या संस्कारांचे कार्य दिवसभराच्या कार्यक्रमातून होत असते. मुख्याध्यापक व सहकारी शिक्षक यांच्या बरोबरीने 'प्रेरक आणि प्रबोधक' संस्कार रुजविण्याचे कार्य करत असतात.
 मुलांच्या मानसशास्त्राचा विचार केल्यास शिक्षकांच्या शिकवण्याबरोबरच त्यांना एखाद्या मार्गदर्शकाची व त्यापेक्षा अधिक मित्राची आवश्यकता असते. ही गरज प्रबोधक भरून काढतात.

रूप पालटू शिक्षणाचे(५३)