पान:रूप पालटू शिक्षणाचे (Roop Paltu Shikshanache).pdf/५८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गोवऱ्या, वाढे विकण्याचे कामही ही मुले करतात. हातात थोडा का होईना पैसा खेळायला लागतो. भोवतालच्या वातावरणातून कुसंस्कार होण्याचीच शक्यता जास्त ! गावाकडे शिकलेली शाळा काही दिवसांतच विसरली जाते. गावी चौथी-पाचवीत नाव असूनही या मुलांना लिहिता-वाचतासुद्धा येत नसते. पत्ते, जुगार खेळणे, विड्या ओढणे या सवयी लागतात. एक निरक्षर आणि हताश, हतबल ऊसतोडणी कामगार या चक्रामधून घडत असतो.
समस्येची व्याप्ती
 गेली चाळीस वर्षे हे चक्र चालू आहे. लहानपणी आईबापाबरोबर बोट धरून आल्याच्या आठवणी अनेक प्रौढ कामगार सांगतात. महाराष्ट्रातील सुमारे १२५ कारखान्यांमधून सरासरी प्रत्येकी पाच हजार कुटुंबे धरली तरी सुमारे सहा लाख कुटुंबांचे म्हणजे कमीत कमी तीस लाख माणसांचे हे स्थलांतर आहे. एकूण स्थलांतरित लोकांपैकी पन्नास टक्के कामगार बीड जिल्ह्यातील आहेत. शाळेत न जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे तीन लाख इतकी आहे.
प्रबोधिनीची भूमिका
 एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी एकीकडे शिक्षणापासून वंचित होत आहेत आणि एकीकडे शिक्षणातील विविध प्रयोग केले जात आहेत. ज्ञान प्रबोधिनीत केले जाणारे शिक्षणविषयक प्रयोग समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी विविध उपक्रमांतून नेहमीच प्रयत्न केले जातात. शिवाय राष्ट्रीय एकात्मता हा प्रबोधिनीच्या कामाचा महत्त्वाचा विषय असल्याने साहजिकच वंचितांसाठी काम हा प्राधान्याने करत असणाऱ्या कामातील एक भाग.
साखरशाळा उद्दिष्ट व कार्यपद्धती
 १०० दिवस चालणारी अन् साखर कारखान्याच्या परिसरातली ही साखरशाळा प्रामुख्याने बालवाडी ते पाचवी-सातवीपर्यंत चालू असते. वयोगटापेक्षा कोणाला काय येते याची चाचणी घेऊन त्यांची इयत्ता ठरवली जाते. प्रत्येक वेळी ती त्यांना सांगणे अडचणीचे जाते. (दहा वर्षांच्या मुलाला/मुलीला तू पहिलीत आहेस हे सांगितलेले आवडत नाही.) म्हणून निर्वर्ग पद्धतीने त्यांना शाळेत शिकविणे चालू केले जाते.
 साखरशाळेच्या कामाची काही उद्दिष्टे ठरविण्यात आली आहेत. साखरशाळेच्या




(५२) रूप पालटू शिक्षणाचे