पान:रूप पालटू शिक्षणाचे (Roop Paltu Shikshanache).pdf/५७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
साखरशाळा प्रकल्पात विद्यार्थ्यांचा सहभाग

 'रूप पालटू देशाचे' या विचाराने कटिबद्ध झालेल्या ज्ञान प्रबोधिनीतील शिक्षणाची सुरुवात बुद्धिमान विद्यार्थ्यांच्या शिक्षणाने झाली. गेली अनेक वर्षे विविध प्रकारचे प्रयोग ह्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केले जात आहेत. अर्थात हे सर्व प्रयोग तेवढ्याच गटापर्यंत मर्यादित न ठेवता समाजाच्या विविध स्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात.
 १९९० च्या सुमारास पडसरे येथील आदिवासी मुला-मुलींसाठी चालविल्या जाणाऱ्या १०० दिवसांची शाळा' या उपक्रमामध्ये प्रबोधिनीचा सहभाग सुरू झाला. शाळेपासून दूर असणाऱ्या, शिक्षण ही दुर्मिळ गोष्ट वाटणाऱ्या गटासाठी सुरू झालेला हा उपक्रम, ही कल्पना मात्र आता प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी एक ताकदवान प्रयोग म्हणून रुजली आहे.
 दुर्गम आदिवासी भागातील या उत्साहवर्धक अनुभवानंतर १९९२ साली ऊसतोडणी मजुरांच्या मुलांसाठी ज्ञान प्रबोधिनीने साखरशाळा सुरू केली.
 महाराष्ट्राच्या समृद्धीचे एक कारण सहकार चळवळीतून उभे राहिलेले साखर कारखाने ! पण या भौतिक शोषणामागचा घटक, ऊसतोडणी कामगार मात्र कायम दुर्लक्षित राहिला आहे. वर्षातील सात-आठ महिने स्वत:चे गाव सोडून महाराष्ट्र रातील व सीमेवरील विविध साखर कारखान्यांच्या परिसरात हे लोक मजुरीसाठी जातात. या कामावरच त्यांचे पोट अवलंबून असते. अर्थात सर्व कुटुंबाचेच हे स्थलांतर असते. ऊसाच्या पाचटातूनच त्यांनी आपली खोपटी उभारलेली असतात. घरातील सर्वांनाच या कामात हातभार लावावा लागतो. अर्थात हे कामही तसे कौशल्याचे. पण मजुरी मिळते ती दिवसाला ४०-५० रुपये. शिवाय मुकादमांकडून आधीच घेतलेल्या उचलीची परतफेड करण्यात ते संपून जातात. शिक्षण नाही. हिशेबाचे ज्ञान नाही, अशा परिस्थितीत वर्षानुवर्षे ही भटकंती सुरूच राहते.
 कुटुंबाबरोबरच अर्थात मुलांचेही स्थलांतर होते. १०-१२ वर्षांहून मोठी मुले- मुली, आई-बापाबरोबर ऊसतोडणीला जातात. पहाटेपासून रात्रीपर्यंत ही ऊस तोडणी-बांधणी-कारखान्यात पोचवणी चालते. अशा वेळी लहान मुले कोप्यांमधूनच असतात. बिनदाराच्या कोपीची राखण करणे, गुरे सांभाळणे, लहान भावंडांची काळजी घेणे, पाणी भरून ठेवणे आणि अन्य वेळात भटकणे हा या छोट्यांचा दिनक्रम. क्वचित प्रसंगी गावातील बाजारात पाणी विकण्याचे किंवा गावात

रूप पालटू शिक्षणाचे(५१)