पान:रूप पालटू शिक्षणाचे (Roop Paltu Shikshanache).pdf/५५

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 प्रयोग :- १. गटचित्रे - ऐतिहासिक, पौराणिक, आधुनिक विषय देऊन त्यांतील १/२ विषयांची निवड ४-५ विद्यार्थ्यांच्या गटाने करून, विषयाला अनुसरून साहित्याचे वाचन करायचे. चित्रबद्ध करण्यासाठी सर्व गटाने कच्ची रेखाटने करायची. त्यातून चित्राची रचना, रंगसंगती ठरवायची. पूर्ण आकाराचा पेपर घेऊन संपूर्ण गटाने एकत्र, एका वेळी चित्र रेखाटणे, रंगविणे इ. काम करायचे. या प्रकारे विद्यार्थ्यांनी शिवाजी, रामायण, कृष्णकथा, भारतीय सण या विषयांची चित्रे काढली. यात स्वत:च्या अभिव्यक्तीबरोबर गटातील प्रत्येकाच्या सहकार्याने चित्रे पूर्ण करण्याचे शिक्षण विद्यार्थी घेऊ शकले. सर्वांच्या एकत्र रेखाटनातून अनेक कल्पना मिळाल्या.
 २. माध्यम– एकच चित्र पेन्सिल,खडू, जलरंग, फेब्रिक पेंट्स यांत काढणे. तसेच कागद, कापड, काच, माती, प्लायवूड अशा पृष्ठभागावर चित्र काढणे, रंगविणे यांतून विविध माध्यमे, पोत यांचा परिचय विद्यार्थ्यांना झाला.
 ३. कोलाज् – रंगीत व वृत्तपत्र कागद, कापड यांच्या तुकड्यांतून चित्रनिर्मिती.
 ४. ग्रीटिंग्ज - विविध प्रसंगांसाठी शुभेच्छा पत्रे.
 ५. गणेश, निसर्ग, प्रसंग चित्रे.
 ६. भित्तीपत्रके, पोस्टर्स, अक्षरचित्रे
यांसारख्या अनेक चित्रप्रयोगातून विद्यार्थ्यांना अभिव्यक्त होता यावे असा प्रयत्न असतो.
 ४. चित्रकला अभिव्यक्तीचे महत्त्व :- चित्रकला अभिव्यक्तीतून आकार, रंग, छटा यांविषयीच्या सौंदर्य जाणिवा विकसित होतात. मुक्त व बद्ध रंगरेषांतून एक शिस्त, वळण लागत असते. 'चित्रकला' अत्यंत व्यापक असे कलामाध्यम आहे. दैनंदिन व्यवहारातील अनेक गोष्टी सुबक, देखणेपणाने सादर करण्यासाठी रंगरेषांचे सामर्थ्य ओळखणे आवश्यक आहे. म्हणूनच चित्रकला हा एक तांत्रिक भाग न राहता, मुलांच्या कल्पनाशक्तीला धुमारे फुटतील असा विषय व्हायला हवा. केवळ नक्कल उतरविणे, ठराविक साच्यात बसविणे नको. कल्पना फुलविण्याचे धडे कलेत आले तर ती सार्थ अभिव्यक्ती होईल. पाहणारे डोळे, आज्ञा पाळणारे हात, अनुभव घेणारे मन यांचा एकत्रित विचार चित्रकला अभिव्यक्तीत केला तर आंतरिक दृष्टीला एक स्वस्थता लाभेल असे वाटते.
 शालेय जीवनात जे संस्कार मुलांच्या मनावर ठसविले जातात, अभिव्यक्त होण्याची, स्वत:च्या अनुभवांची मांडणी करण्याची संधी त्यांना जेवढी दिली जाते, तेवढी व्यक्तिमत्त्व विकासाची क्षेत्रे त्यांच्यासाठी खुली होतात. विविध

रूप पालटू शिक्षणाचे(४९)