Jump to content

पान:रूप पालटू शिक्षणाचे (Roop Paltu Shikshanache).pdf/५४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रत्येकाची वेगळी असते. उदाहरण पाहायचे तर, 'पतंग उडविणारी मुले' या साध्या विषयात, खिडकीतून पतंग उडविणाऱ्या मुलापासून ते जंगलात पतंग उडविणारी मुले इथपर्यंत विस्तार असतो. 'काहींचे आकाश मोठे, पतंगाचे ठिपके व मुले लहान' असे चित्र तर काही वेळा 'धागे गुरफटलेले पतंग' असू शकतात. एकदा एकाने तर त्याच्या या विषयात पतंगांकडे बघणारा पाठमोरा हत्ती काढला होता. कारण विचारले तर म्हणाला, 'आवडतो मला हत्ती ! चांगला काढता येतो.' मंदारची चांगली चित्रे पाहून त्याला विचारले, 'तुला कसली चित्रे काढायला आवडतात ?' 'झुरळांची.' 'का रे ?', 'अहो, आमच्या घरात इतकी झुरळे आहेत की, ती डोळ्यांवरूनही फिरतात, झोपलो की ! त्यामुळे ती माझ्या चांगली लक्षात राहतात !' एखाद्या विषयाला चित्ररूप का द्यावे वाटते याचे उत्तर या उदाहरणांमध्ये आहे. एका मुलीने बाजारपेठेचे चित्र काढताना चित्रातील एका पाटीवर लिहिले होते, “येथे फॉल- पिको करून मिळेल.” “तू एवढीच पाटी का लिहिलीस ?" “माझी आई मला फॉल-पिको करून आणायला सांगते ना?"
 एखाद्या प्रसंगाचा, दृश्याचा उमटलेला ठसा, मुलांचे निरीक्षण चित्रातून अभिव्यक्त होते. रंगपेटीतील टवटवीत, गडद, ताजे रंग वापरण्यातून मुलांची नैसर्गिक आवड कळते. रंगांच्या मिश्रणापेक्षा, लाल, पिवळा, निळा हे मूळ रंग वापरण्याकडे मुलांचा कल दिसतो. नदी, डोंगर, धबधबा, गवत यांची चित्रे काढताना पुन्हा प्रत्येकाचा निसर्ग वेगळा असतो. अंतराळ, चांद्रयान, यंत्रमानव असे चित्रविषयही मुले काढतात. वस्तूंचा हुबेहूबपणा, त्रिमिती, छायाप्रकाश, अंतराची योजना हे घटक सराव व तंत्र यामुळे येतात. पण स्वत:च्या कल्पना, विचार चित्रांमधून इतरांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न मुले करत असतात. ऐतिहासिक, पौराणिक कथांचा प्रभाव किशोर गटातील मुलांमध्ये असतो. तोही चित्रांमध्ये व्यक्त होत असतो. उत्स्फूर्तता, ताजेपणा व जोम ही मुलांच्या रेखाटनातील मुक्त अभिव्यक्तीची वैशिष्ट्ये असतात.अनुकरण करून हुबेहूब काढलेल्या चित्रांपेक्षा ही वैशिष्ट्ये असलेली रेखाटने नैसर्गिक वाटतात.
३. चित्रकला अभिव्यक्ती विकसन तासिका:- या तासिका घेण्यामध्ये केवळ अभ्यासक्रमातील एक विषय एवढाच माझा हेतू नाही. तर अभिरुची, सौंदर्यदृष्टी वाढविणारे आनंददायी माध्यम म्हणून चित्रकला अभ्यासावी असे वाटते. विद्यार्थ्यांच्या मनातील अनुभव मांडण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणे, त्यांची रंगरेषांची समज, भावनांचा गोंधळ जाणून घेऊन त्यांना चित्रे काढायला लावणे असा प्रयत्न मी करते.


(४८)रूप पालटू शिक्षणाचे