Jump to content

पान:रूप पालटू शिक्षणाचे (Roop Paltu Shikshanache).pdf/५२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तज्ज्ञ यांचा परिसंवाद झाला. त्यामध्ये 'कलात्मक मनाची मशागत कशी करूया' ह्या विषयावर परिचर्चा झाली. अभिव्यक्तीची कृती, निरीक्षण, रसग्रहण या तीन गोष्टींचा समावेश कलाशिक्षणात असतो. अभिव्यक्त होण्याचे शिक्षण देणे अवघड असले तरी अशक्य नाही. यासाठी शिक्षकाची भूमिका लक्ष देणाऱ्या मार्गदर्शकाची, प्रेरणा देणारी आणि प्रेमळ परिचारिकेसारखी हवी. रंग, आकार, सूर, शब्द, अभिनय यांबद्दल येणाऱ्या अनुभवांची मुलांमधील तीव्र उत्कटता व अभिव्यक्ती जपणे व त्यातून व्यक्तिमत्त्व विकास करणे ही गोष्ट महत्त्वाची वाटते. हे काम उत्तम शिक्षक करतो. यांसारख्या विचारांची पुनर्मांडणी व चर्चा झाली. उद्दिष्टांची निश्चिती, अडचणी, प्रत्येक माध्यमाचा प्रतिसाद इ. गोष्टी परिसंवादात बोलल्या गेल्या. माजी विद्यार्थी व अभिव्यक्ती शिक्षकांना, अध्ययन-अध्यापनातील घडामोडींच्या उजळणीसाठी एक प्रश्नावली देण्यात आली. त्यातील प्रतिसादानुसार काही सुधारणा, माजी विद्यार्थ्यांना भेटणे, त्यांचे अनुभव आजी विद्यार्थ्यांना सांगणे, वर्तमान स्थितीमधील कलाप्रवाह अभ्यासणे या गोष्टी करणे सुरू आहे.
 सरस्वती पूजनाचा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीसाठी पूर्ण दिवस योजला होता. यात वेगवेगळ्या वर्गांमध्ये अभिव्यक्ती तासिकांमध्ये शिकलेल्या कलाकृतींचे प्रदर्शन आयोजित केले होते. नृत्य, नाट्य, संगीत या अभिव्यक्ती माध्यमांना विद्यार्थी सादर करीत होते.
 १८ सप्टेंबर ९८ ला मा. अलका देव-मारुलकर यांचे गायन विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले होते. यातून गायनासाठी घ्यावे लागणारे परिश्रम, सादर करण्याची पद्धत,संगीताचा आनंद व अभिरुची यांचे संस्कार विद्यार्थ्यांवर झाले.
निष्कर्ष
 १. अभिव्यक्ती विकसनाच्या तासिकांमुळे विद्यार्थ्यांची रसग्रहण, निरीक्षण क्षमता वाढते आहे.
 २. प्रभावित करणाऱ्या गोष्टींची नोंद करणे, स्मरण वाढविणे, समजलेल्या गोष्टींचे स्पष्टीकरण करणे, प्रतिसाद देणे, व्यवहारात उपयुक्त गोष्टींची निर्मिती करणे असा बहुदिश लाभ विद्यार्थ्यांना मिळतो आहे.
 ३. शाळेत व बाहेर होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्यांची व पारितोषिके मिळविणाऱ्यांची संख्या वाढते आहे.
 ४. अभिव्यक्तीच्या तासिकांमध्ये मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे विद्यार्थी छोटी नाटके, कविता, कथा, लिहून दाखवतात. छान चित्रे काढतात, गाण्याचा

(४६)रूप पालटू शिक्षणाचे