पान:रूप पालटू शिक्षणाचे (Roop Paltu Shikshanache).pdf/४५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 पाठ्यपुस्तकांखेरीज कमीत कमी ५० अन्य पुस्तकांचे वाचन होते. यामुळे विद्यार्थ्यांची नवीन शब्द, प्रसंग, विचार यांच्याशी ओळख होते. या सर्वांचा त्यांच्या सर्वांगीण विकासात नक्की उपयोग होतो. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होते, जी त्यांना पुढील आयुष्यात अत्यंत उपयुक्त ठरते.
 शास्त्रीय उपकरण करताना वेगवेगळ्या शास्त्रीय तत्त्वांचा स्वत: अभ्यास करण्याची सवय लागते. शास्त्रीय तत्त्व समजून घेऊन त्यावर आधारित उपकरण तयार करण्याचा आनंद मिळतो. यातून विद्यार्थ्यांमधील निरीक्षण क्षमता, सातत्य, चिकाटी, कल्पकता इ. सुप्त गुणांचा विकास होण्यास मदत होते.
 वृत्तपत्र कात्रण संग्रह तयार करीत असताना संपूर्ण वृत्तपत्र वाचणे, आपल्या विषयावरील बातम्या, माहिती शोधून काढणे, वेळेवर त्यांची कात्रणे काढणे इ. गोष्टी त्यांना कराव्या लागतात. त्यामुळे वृत्तपत्रातील वेगवेगळ्या विषयांची ओळख होते. आपल्या विषयातील काय उपयुक्त आहे हे ओळखता येऊ लागते.
 वरील सर्व गोष्टी इ. सातवीच्या वर्षाच्या शेवटी किंवा काही मुलांच्या बाबतीत आठवीत जाणवू लागतात. या सर्व मुलांना त्यांच्या पुढील आयुष्यात या गोष्टींचा उपयोग होतो. उदा. नेहमी सर्वसाधारणगुणांनी उत्तीर्ण होणारी परंतु जिला शिष्यवृत्ती' मिळाली अशी इ. बारावीतील विद्यार्थिनी म्हणते, “मुलाखत घेण्यामुळे धीटपणा आला. शिष्यवृत्ती परीक्षा फक्त लेखी नव्हती, त्यामुळे वेगळे काहीतरी करायला मिळाले व माझा आत्मविश्वास शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे वाढला."
 प्रशालेतील माजी विद्यार्थी अपूर्व म्हणतो, “पुस्तके वाचून टिपणे काढणे या विषयामुळे अनेक पुस्तके वाचली व त्यांची टिपणे काढली. त्याचा उपयोग शालेय अभ्यासातील टिपणे काढताना, एखाद्या कवितेचे रसग्रहण करताना, प्रकल्पाची प्रस्तावना लिहिण्यासाठी झाला."
 सध्या महाविद्यालयात शिकणारा अभिजीत डिंगरे म्हणतो, "निवडणुकीच्या वेळी आमच्या वॉर्डात १००% मतदान व्हावे अशी इच्छा होती. त्यासाठी वॉर्डातील बऱ्याच लोकांना मतदानाचे महत्त्व आत्मविश्वासपूर्वक पटविता आले. याचे बीज कुठेतरी इ. सातवीत रुजले होते."
 प्रशालेतील माजी विद्यार्थिनी अपर्णा कुलकर्णी म्हणते, “कॉलेजमध्ये नोट्स काढताना काहीही अडचण येत नाही. प्रतिभाशाली लेखनामुळे मी आपल्या लेखनात उत्तम शब्दांचा, सुविचारांचा उपयोग करते. त्यामुळे कोणत्याही विषयावर निबंध लिहिताना काहीही अडचण येत नाही. भीती वाटत नाही. प्रतिभाशाली लेखनानेच मला कविता करण्यास प्रेरणा दिली असे वाटते."

रूप पालटू शिक्षणाचे (३९)