शास्त्रशिक्षक २ तास मूलभूत संकल्पनेबाबत मार्गदर्शन करतात. मार्चच्या प्रारंभी
उपकरणाची उपयोगिता, सुबकता, प्रमाणबद्धता, नावीन्य याच्या आधारे परीक्षण
केले जाते व तोंडी परीक्षेद्वारा शास्त्रीय तत्त्वाची समज, प्रतिकृती तयार करताना केलेली
धडपड इ.च्या आधारे गुणांकन केले जाते.
८. मुलाखत घेणे:- शहरातील विविध क्षेत्रांमधील ८०-९० व्यक्तींच्या नावाच्या
चिठ्या केल्या जातात. दोघांनी मिळून एक चिठ्ठी उचलून त्यामध्ये ज्या व्यक्तीचे
नाव असेल, त्यांच्याशी संपर्क करून, मुलाखतीची वेळ ठरवून, सविस्तर मुलाखत
घ्यायची व ती लिहून सादर करायची असते. अध्यापकांपैकी कोणीतरी प्रश्न कसे
काढावेत ? कसे विचारावेत ? इ. बाबत मार्गदर्शन करतात. ज्या व्यक्तीची मुलाखत
विद्यार्थी घेतात त्यांना बंद पाकिटातून एक पत्र दिले जाते व विद्यार्थ्यांचा
आत्मविश्वास, प्रश्न विचारण्याची शैली, प्रश्नांचा दर्जा, सहजपणा, इ. च्या आधारे
मूल्यमापन करून लेखी अभिप्राय देण्याची विनंती त्यांना केली जाते. तसेच मुलांनी
लिहिलेल्या मुलाखतीच्या आधारे शिक्षक परीक्षण करतात.
९. जीवनावश्यक कौशल्ये आत्मसात करणे :- वेगवेगळी, कडधान्ये, डाळी,
पिठे यांतील फरक ओळखणे, भात-पिठले, खिचडी-रस्सा, यांपैकी एक पदार्थ
करता येणे, एखाद्या भागाचा चिह्न वापरून, प्रमाणबद्ध नकाशा तयार करणे, फ्यूज-
ट्यूब बदलणे, नळाचा वॉशर बदलणे, पुस्तकांची बांधणी करणे, रंगकाम करणे,
पोस्टाचे-बँकेचे व्यवहार करणे, मूलभूत शिवणकाम करणे, सायकलचे पंक्चर काढणे
इ. व्यावहारिक कौशल्यांपैकी (या यादीत स्थानिक गरजेप्रमाणे भर घालता येईल) ५
ते ६ कौशल्ये विद्यार्थ्यांनी करून दाखवायची असतात. त्याशिवाय
प्रथमोपचाराबाबतची माहिती सर्वांना आवश्यक मानली आहे. शाळेतील अध्यापक,
कर्मचारी सदस्य, पालक यांच्या मदतीने या कौशल्यांबाबत प्राथमिक ज्ञान
साधारणपणे ८ ते १० तासिकांमध्ये मिळून दिले जाते. विषयाची जाण,
नीटनीटकेपणा, सहजता, सुबकता, स्वच्छता इ. गोष्टींच्या आधारे जानेवारी महिन्यात
प्रत्यक्ष कृती करायला सांगून परीक्षण केले जाते.
१०. संकीर्ण:- दर वर्षी किंवा २-३ वर्षांनी वेगवेगळ्या कौशल्यांची योजना यामध्ये
केली जाते. भाषेतील शब्दज्ञान, दैनंदिनी लेखन, हस्ताक्षर-शुद्धलेखन (श्रुत व
अनुलेखन) समस्या परिहार, शास्त्रीय विषयावर परिसंवाद सादर करणे, तोंडी गणिते
सोडविणे हे विषय आत्तापर्यंत या योजनेमध्ये घेण्यात आले आहेत. त्या-त्या वर्षी ज्या
अध्यापकांकडे या योजनेच्या कार्यवाहीची जबाबदारी असते ते हा दहावा विषय
ठरवतात. आधीच्या शिक्षकांचा अनुभवही त्याबाबत विचारात घेतला जातो.
रूप पालटू शिक्षणाचे(३६)
पान:रूप पालटू शिक्षणाचे (Roop Paltu Shikshanache).pdf/४२
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.