पान:रूप पालटू शिक्षणाचे (Roop Paltu Shikshanache).pdf/४१

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दोन वेळा टिपणवही तपासली जाते व विद्यार्थ्यांची वाचलेल्या पुस्तकांबाबत तोंडी परीक्षा घेतली जाते.
३. पाठांतर :- हिंदी, मराठी, इंग्रजी व संस्कृत या भाषांमधील वेचक सुभाषिते, उतारे, कविता, श्लोक, स्तोत्रे इ. जुलैमध्ये विद्यार्थ्यांना दिले जाते. एकूण मिळून ४०० ओळी पाठ करणे अपेक्षित असते. भाषाशिक्षक आपापल्या तासांना प्रारंभी ५ मिनिटे पाठांतरासाठी, ते म्हणवून घेण्यासाठी देतात. अस्खलित पाठांतर, स्पष्ट उच्चार, या आधारे फेब्रुवारीत तोंडी परीक्षा घेतली जाते.
४. प्रतिभाशाली लेखन:- विद्यार्थ्यांनी स्वतःच्या प्रतिभेने कोणत्याही भाषेमध्ये दिलेल्या प्रकारामध्ये (संवाद, कविता, गोष्ट, नाट्य इ.) लेखन करायचे असते. भाषा- शिक्षकांच्या द्वारा वर्षात ६ ते ७ तास याचे प्रशिक्षण दिले जाते. जानेवारी महिन्यात लेखी परीक्षा असते. याच्या प्रशिक्षणासाठी प्रबोधिनीतर्फे 'प्रतिभेच्या प्रांतातील प्रवास' हे पुस्तक प्रकाशित केले आहे. मांडणी, स्वप्रतिभा, कल्पनेतील नावीन्य, भाषेची जाण, शब्दरचना, शैली इ. गोष्टींचे मूल्यमापन केले जाते.
५. वक्तृत्व :- दिलेल्या विषयांमधील विषय निवडून त्यावर स्वत: ३ मिनिटांच्या वक्तृत्वाची तयारी करणे व संपूर्ण शाळेसमोर ३ मिनिटांचे भाषण करणे असे स्वरूप असते. वक्तृत्व उत्तम असलेल्या शिक्षकांद्वारा ३ ते ४ तास भाषणाची पूर्वतयारी क शी करावी, वक्तृत्वशैली, इ. आधारे मार्गदर्शन केले जाते. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये रोज प्रार्थनेनंतर तीन विद्यार्थी सर्वांसमोर बोलतात, त्या वेळी त्यांचे मूल्यमापन सभाधीटपणा, उच्चार, शैली, विषयाची समज या आधारे केले जाते.
६. वृत्तपत्र कात्रण संग्रह करणे:- विद्यार्थ्यांना सुमारे ५० विषयांची यादी दिली जाते. त्यातील कोणत्याही एका विषयावर ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीतील किमान ३ ते ४ वृत्तपत्रे-नियतकालिके यांच्यामधून कात्रणे कापून ती एका वहीत चिकटविणे, त्यांचे संदर्भ लिहिणे, त्याला स्वत:ची प्रस्तावना लिहिणे, वही सजविणे असे अपेक्षित असते. शाळेतील अध्यापकांद्वारा ऑक्टोबरमध्ये २ ते ३ तास वृत्तपत्रे- नियतकालिकांचा परिचय, कात्रण संग्रह करताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी इ. बाबत मार्गदर्शन केले जाते. डिसेंबर अखेरीस कात्रण संग्रहाचे परीक्षण, प्रस्तावना, कात्रणांची निवड, संख्या, विषयाची व्याप्ती, सजावट इ.च्या आधारे केले जाते. विषयाचे आकलन किती झाले हे समजण्यासाठी तोंडी परीक्षाही घेतली जाते.
७. वैज्ञानिक उपकरण (Working Model) तयार करणे :- वैज्ञानिक तत्त्वांचे उपयोजन करून, कमीत कमी खर्चात, नवीन कल्पना वापरून, दैनंदिन वापरातील यंत्रांमध्ये बदल करून अथवा स्वतंत्रपणे एक कार्यरत प्रतिकृती तयार करायची असते.

रूप पालटू शिक्षणाचे (३५)