पान:रूप पालटू शिक्षणाचे (Roop Paltu Shikshanache).pdf/३३

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
क्रीडामहोत्सव
पिंपरी-चिंचवड परिसरातील शालेय स्तरावरील क्रीडाक्षेत्रातील एक चळवळ


 ज्ञान प्रबोधिनी समाजाच्या सर्व क्षेत्रांत विकासाची कामे करीत आहे. क्रीडा क्षेत्रातही गेली बारा वर्षे निगडीच्या नवनगर विद्यालयात काम चालू आहे.
 ‘मन वज्र हवे अन् मनगट ते पोलाद' या स्वामी विवेकानंदांच्या विचारानुसार आपल्या मनगटाची ताकद आजमावण्यासाठी ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयाच्या कार्यकर्त्यांनी १९८८ सालापासून क्रीडास्पर्धा (Mini Olympics) सुरू केल्या.
 आपण दररोज एखाद्या खेळाचा सराव करीत असलो तरी तो सराव योग्य दिशेने चालू आहे ना ? त्यामुळे आपले नैपुण्य (performance) उंचावते आहे ना ? हे तपासण्यासाठी दुस-या व्यक्तीबरोबर स्पर्धा करणे गरजेचे असते. तसेच ज्याप्रमाणे ऑलिम्पिक क्रीडास्पर्धांमध्ये जगातील सर्व राष्ट्रे परस्परांमधील भेदभाव, हेवेदावे विसरून, अत्यंत चुरशीने स्पर्धेत भाग घेतात व नवनवीन विक्रम प्रस्थापित करतात आणि आपले क्रीडाक्षेत्रातील नैपुण्य दाखवून प्रेक्षकांची शाबासकी मिळवितात, त्याचप्रमाणे पिंपरी-चिंचवड परिसरातील शाळांमधील खेळाडूंनी एकत्र येऊन, आपले क्रीडा कौशल्य तपासून बघावे, मैत्रीच्या नात्याने तरीसुद्धा अत्यंत चुरशीने स्पर्धांमध्ये भाग घ्यावा, कौशल्यप्राप्त खेळाडूंचा खेळ जवळून बघावा, विचारांची देवाण-घेवाण करावी या हेतूने या स्पर्धाना सुरुवात करण्यात आली.
 पुणे शहराची तुलना करता पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसर हा नव्याने विकसित होणारा परिसर आहे. पुण्याला क्रीडा संस्कृतीची परंपरा लाभलेली आहे. त्याचप्रमाणे पिंपरी-चिंचवड परिसरात क्रीडा संस्कृतीचे रोपण करावे, ज्यायोगे या भागातील खेळाडूंनासुद्धा विविध संधी उपलब्ध होतील या विचाराने क्रीडास्पर्धाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
उद्दिष्टे

  • पिंपरी-चिंचवड परिसरात क्रीडेचे वातावरण निर्माण करणे.
  • शाळांमधून विविध खेळांचा प्रचार व प्रसार वाढविण्यासाठी चुरशीची

 स्पर्धा उपलब्ध करून देणे.

  • परिसरातील खेळाडू, पंच, क्रीडाशिक्षक, पालक, क्रीडासंघटक,

 क्रीडाप्रशिक्षक, क्रीडाप्रेमींचे संघटन करणे.

  • नि:पक्षपाती, उत्कृष्ट व आदर्श संयोजनाचा नमुना उभारणे.

रूप पालटू शिक्षणाचे(२७)