पान:रूप पालटू शिक्षणाचे (Roop Paltu Shikshanache).pdf/२६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
सहाध्यायदिन


 ज्ञान प्रबोधिनीतील शिक्षणाचे उद्दिष्ट राष्ट्रघडणीसाठी व्यक्तिविकास' हे आहे. इथे मानवतेबद्दल आस्था निर्माण करणे हे शिक्षणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणून मानले आहे. राष्ट्रहिताबद्दल आस्था निर्माण होण्यासाठी सर्व बौद्धिक विषयांच्या (पाठ्यक्रमातील विषयांच्या) अभ्यासातून राष्ट्राच्या मध्यवर्ती प्रश्नांची जाण येणे गरजेचे आहे. केवळ जाण येणे पुरेसे नसून हे प्रश्न सोडविण्यासाठी स्वत: प्रयत्न करण्याची प्रेरणा शिक्षणातून मिळायला हवी.
 ही प्रेरणा मिळवण्यासाठी पाठ्यपुस्तकी अभ्यासक्रमाची चौकट ओलांडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या असतात असे नजरेला आणून देणे, शिकण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे हा या अभ्यासक्रमामागचा मुख्य उद्देश आहे. प्रबोधिनीचा विद्यार्थी हा समाजाभिमुख असायला हवा. त्यासाठी प्रत्यक्ष समाजाचे दर्शन होणे गरजेचे आहे. असे दर्शन नैमित्तिक का होईना पण व्हावे म्हणून हा उपक्रम योजला आहे.
हेतू
 विद्याथ्र्यांना विविध प्रकारचे अध्ययन अनुभव देणे हा शिक्षण प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग आहे, असे म्हणता येईल. परंतु अनेकदा प्रचलित शिक्षणाच्या घट्ट चौकटीत इच्छा असूनही अनेक अनुभव आपण विद्याथ्र्यांना देऊ शकत नाही. शाळेच्या बाहेर, घरी अथवा समाजात वावरताना विद्यार्थी अनेक अनुभवांना कळत-नकळत सामोरे जात असतात. परंतु हे अनुभव त्यांनी जाणीवपूर्वक घेतलेले नसतात. अशा अनुभवांचे नंतर विश्लेषण केले जात नाही. त्यामुळे या अनुभवांना पूर्णाशाने अध्ययन अनुभव म्हणता येईलच असे नाही. संवेदनशील मुलांमुलींच्या बाबतीत मात्र असे अनुभव प्रेरणादायी, शिकवणारे असू शकतात.
 शिक्षकाला चौकटीबाहेर जाऊन जर असे अनुभव देण्याची इच्छा असेल तर शाळेच्या वेळापत्रकात त्याला वेळ उपलब्ध असला पाहिजे. या हेतूने प्रबोधिनीत सहाध्यायदिन राखून ठेवले आहेत. शिक्षणातील अनेक उपक्रमांप्रमाणेच हा उपक्रमही स्वाभाविकरीत्या अभ्यासक्रमाचा भाग बनून गेला तर त्यासाठी वेळापत्रकात वेगळी व्यवस्था करण्याचे कारणच उरणार नाही. औपचारिक सहाध्यायदिनाचे अनौपचारिक सहअध्ययनात रूपांतर होणे हा यशस्वी शिक्षण प्रक्रियेचा महत्त्वाचा निकष ठरू शकतो.




(२०) रूप पालटू शिक्षणाचे