पान:रूप पालटू शिक्षणाचे (Roop Paltu Shikshanache).pdf/१४

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अधिकार आहे हे ओळखावे. मग प्रबोधिनीतील शैक्षणिक उपक्रमांच्या विस्तारामागचा प्रेरणा-स्रोत त्यांना सापडेल. तो सापडला तर मग उपक्रमांचा विस्तार प्रत्येकाला स्वतंत्रपणे करता येतो. इतरांचे प्रयोग आधारासाठी व संदर्भासाठी घ्यायचे असतात.
जीवनदायी शिक्षण
 शाळांचा विचार करत असताना आज सर्वत्र तात्त्विक पातळीवर सर्वंकष शिक्षणाचा आणि व्यावहारिक पातळीवर पुस्तकी शिक्षणाचा प्राधान्याने विचार होतो. सर्वंकष शिक्षणातील आत्मिक शिक्षण या घटकाचा विचार प्रबोधिनीत प्राधान्याने उपासनेभोवती विकसित झाला आहे. बौद्धिक शिक्षणासाठी पुस्तकांचे औपचारिक अध्यापन या भोवती समाजातील प्रचलित विचार चालतो. त्यापेक्षा प्रबोधिनीची अध्यापनाची वेगळी भूमिका आहे. म्हणून उपासना व अध्यापनाची भूमिका यांचा निर्देश सर्वप्रथम केला आहे. व्यक्तीचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आत्मिक विकास होण्यापूर्वी व्यक्तीचा उदरनिर्वाह नीट चालला असला पाहिजे. त्यामुळे जेवणदायी शिक्षणाचा विचारही सर्वंकष शिक्षणात झाला पाहिजे.
 ग्रामीण भागात पुस्तकी शिक्षणात अयशस्वी झालेल्यांना निव्वळ तांत्रिक शिक्षण देऊन त्यांना उदरनिर्वाहाच्या बाबतीत स्वावलंबी करणे हे प्रबोधिनीने जास्त महत्त्वाचे मानले. तांत्रिक शिक्षणातून उपजीविकेसाठी आवश्यक कौशल्ये शिकवली तरी ते प्रबोधिनीला पुरेसे वाटले नाही. ग्रामीण भागातही नोकरीसाठी शिकवणे बरोबर नाही. कौशल्ये असल्यावर नोकरी मिळणे हा भाग मागणी-पुरवठा न्यायाने होणार. स्वयंरोजगार निर्माण करता येणे हे जीवनदायी शिक्षणाचे उद्दिष्ट असले पाहिजे. कुठेतरी रोजगार मिळवणे ही व्यावहारिक तडजोड आहे. स्वयंरोजगार निर्माण करता येण्यासाठी उद्योजकतेचे शिक्षण द्यायला हवे असे प्रबोधिनीने ठरवले. शिवापूर येथील कृषि-तांत्रिक विद्यालयात नवजीवन वर्गामध्ये तांत्रिक शिक्षण व उद्योजकतेचे शिक्षण यांची सांगड घालण्याचा प्रयोग काही वर्ष प्रबोधिनीने करून पाहिला.
 पुढाकार घेणे, संधी हेरणे व संधी पकडणे, चिकाटी, माहिती शोधत राहणे, उत्तमतेची काळजी, शब्द पाळणे, कार्यक्षमता, नियोजन, अडचणींमधून मार्ग काढणे, आत्मविश्वास, इतरांना ठामपणे सामोरे जाणे, इतरांचे मन वळवणे, दक्षता, सहका-यांचा विचार, जोखीम पत्करणे हे सर्व उद्योजकतेसाठी आवश्यक गुण आहेत. उपजीविकेसाठी हस्तकौशल्ये, तांत्रिक कौशल्ये वा बुद्धिकौशल्ये इ. कोणतीही कौशल्ये प्राधान्याने वापरली तरी त्या जोडीने स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी(८) रूप पालटू शिक्षणाचे