पान:रूप पालटू शिक्षणाचे (Roop Paltu Shikshanache).pdf/१३

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अध्यापकांचा संच धोरणानुकूल करणे
 शैक्षणिक भूमिका कितीही प्रागतिक मांडली, उपक्रमांचे नियोजन त्यानुसार कितीही महत्त्वाकांक्षी केले, तरी बरीचशी कार्यवाही अध्यापक करत असतात. अध्यापकांचे शिक्षण या भूमिकेनुसार झालेले नसल्याने त्यांची मनोवृत्ती अशा बदलाला अनुकूल असतेच असे नाही. त्यामुळे या सगळ्या भूमिका व तत्त्वज्ञान अंमलात आणण्यास दीर्घ काळ लागतो. दीर्घ काळ अध्यापकांचे प्रशिक्षण करावे लागते. एखादी योजना एकदा समजावून सांगितली तरी पुन्हा पुन्हा अध्यापकांच्या मनात संशय निर्माण होतात. त्यांचे बौद्धिकदृष्ट्या समाधान केले तरी ते तात्पुरते राहते. या भूमिका प्रचलित भूमिकेपेक्षा जास्त परिणामकारक आहेत याचा साक्षात अनुभव घेतल्यावरच थोडी थोडी अनुकूलता येते. नवीन नवीन उपक्रमांमागचे शैक्षणिक मानसशास्त्र, ते उपक्रम कार्यवाहीत आणण्यासाठी लागणारी नियोजन कौशल्ये व व्यवस्थापन कौशल्ये, औपचारिक शिक्षणातील यशाच्या प्रचलित मापदंडांनुसार यशस्वी अध्यापन करत स्वत:च्या विचारपद्धतीत बदल करत असताना होणारा मानसिक संघर्ष सहन करण्याची युक्ती, या सर्वांचे प्रशिक्षण अध्यापकांना द्यावे लागते. त्याच्या यशावर बाकीचे यश अवलंबून आहे.
प्रचलित शिक्षण-व्यवस्थेतील इतर घटक
 मुख्याध्यापक, संस्थाचालक, पालक, शासकीय अधिकारी, शासनाचे निर्णय व समाजाच्या अपेक्षा या सर्वांचा परिणाम अध्यापकांच्या अध्यापनावर व विद्याथ्र्यांच्या अध्ययनावर होत असतो. मुख्याध्यापक व संस्थाचालक शिक्षणात प्रयोग करू इच्छिणारे, वेगळे शैक्षणिक धोरण राबवू इच्छिणारे असतील तरच शाळेतील वातावरण व कार्यपद्धतीत काही बदल होऊ शकतो. हे दोन घटक अनुकूल आहेत हे गृहीत धरून व अध्यापकांच्या प्रशिक्षणाला यश येणार आहे असा विश्वास ठेवून शैक्षणिक उपक्रमांची मांडणी या पुस्तिकेत केली आहे. अध्यापक, मुख्याध्यापक, संस्थाचालक हे तीन्ही एकवटले तर विद्यार्थ्याच्या औपचारिक शिक्षणात चांगले बदल दिसायला लागतील. असे चांगले बदल दिसायला लागले तर पालक, समाजातील उर्वरित घटक, शासकीय अधिकारी व सर्वात शेवटी शासकीय धोरण व नियम बदलतील. त्यामुळे या तीन घटकांनी बाकीच्या घटकांशी जुळवून घेणारे न बनता, स्वत: पुढाकार घेऊन या घटकांना वळवून घेणारे बनावे लागेल. अशी इच्छा असणा-यांना प्रबोधिनीच्या शैक्षणिक प्रयोगांतून व उपक्रमांतून स्वतः काय करता येईल हे सुचू शकेल. हे उपक्रम सर्वांना जसेच्या तसे राबवता येतीलच असे नाही. ज्यांना ज्यांना समाजात काही नवे वळण पाडावे असे वाटते त्यांनी प्रथम तसा विचार व प्रयत्न करण्याचा आपल्याला निसर्गदत्तरूप पालटू शिक्षणाचे(७)