पान:रुपक.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



बापू: तो फोटो लडाखचा नाहीये. जवळ जाऊन पाहत हॅ, यात कुठंय
 बर्फ ? हा तर जम्मूचा आहे. रूपा ऽ ऽ मला बनवतेस ?
रूपा : काय करणार ? एक माणूस आमच्याशी बोलायलाच तयार नाही.
 मग त्याला आणला फिरवून लडाखला !
बापू: (उत्साहाने) सगळी हिमशिखरं सारखी दिसतात, रूपा, तू हा फोटो
 पाहा. (तिच्या अंगाला स्पर्श होतोय) हा ना रोहतांग पासचा आहे !
रूपा : ब्युटिफूल s !
लता: तू गंमत सांगणार होतीस ना रूपा ?
रूपा: आठवून येस ! बॅप्स, झालं काय माहिती ? कंपनीत जॉनी
 नावाचा कलिग आहे आमचा. मॉम, त्याचं मूळ नाव आहे मल्हारी.
 पण 'बीपीओ' कल्चरमध्ये सूट नाही होत म्हणून त्यानं 'जॉनी'
 नाव सांगायला सुरू केलं. आजच कळलं ते गुपित !
लता: त्यात काय ? अलीकडं अशी टुमच निघालीय. खूप जण नावं तरी
 बदलतात किंवा आडनावं तरी.
रूपा: नावं बदलायचं कळलं, पण आडनावं बदलायचं कारण काय ?
लता : रूपा, अग आडनावांवर बराच खेळ असतो. कोणत्याही सरकारी
 ऑफिसात जा. आडनाव पाहतात. आपल्या जवळचं वाटलं की
 काम झटकन होतं. आणि लांबचं वाटलं की साध्या कामालाही
 दफ्तरदिरंगाई !
रूपा: एऽ म्हणजे काय मला नाही कळलं. नीट सांग ना.
बापू: (तिला थोपटून) म्हणजे बघ रूपा, आपल्या जातीजवळ जाणारं
 आडनाव असलं, थोडक्यात आपल्या जातीचा असेल तर
 काम फत्ते, नाहीतर टाका जुळतील असे पत्ते !
लता: आणि हा अगदी सर्वसाधारण अनुभव आहे.
रूपा : त्यासाठी आडनाव बदलायचं ?
लता: हो. आणि ते इतकं बेमालूम की आडनाव वाचून जात कळूच नये
 माणसाची.
बापू: किंवा तो चकला तरी पाहिजे. आमच्याकडं एक 'कोसला' म्हणून
 क्लार्क होता. मी विचारलं त्याला भालचंद्र नेमाडेंची 'कोसला'
 तुमची कोण, तर म्हणाला त्यावरूनच पडलंय आमचं ते आडनाव.


रुपक । २६ ।