पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/97

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


नाही. कारण फाळणीच्या धक्क्यामुळे पुढील घटना निर्विकारपणे समजून घेण्याइतका विवेक राहिला नाही. पाकिस्तानच्या निर्मितीचे जीनांचे यश नेहमी नजरेत भरते. हे यश ब्रिटिश बागनेटांचे होते हे आपल्याला आणि जीनांनाही जाणवलेले नाही. जीनांना आपल्या यशाची नशा चढली. स्वत:च्या कर्तृत्वाच्या मर्यादा त्यांना समजल्या नाहीत. म्हणून. सत्तांतर होताच जीनांनी टाकलेला प्रत्येक पवित्रा पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे एकामागून एक कोसळला.
 भारतातील सुशिक्षित धर्मसमुदायवादी मुसलमान आणि पुनरुत्थानवादी धार्मिक मुसलमान अशा दोन विचारप्रणालींचा मी मागेच उल्लेख केला आहे. जीना धर्मसमुदायवादी होते असेही .. म्हटले आहे. धर्मसमुदायवादी व पुनरुत्थानवादी यांच्यातील विरोधाची चर्चा सविस्तर केली आहे. परंतु भाबडे टीकाकार जीनांसारखे धर्मसमुदायवादी आणि पुनरुत्थानवादी यांच्यात उगाच फार फरक करतात आणि या जणू दोन परस्परविरोधी विचारसरणी आहेत असे मानतात. वस्तुत: धर्मसमुदायवादी जीना व पुनरुत्थानवादी मौ. मौदुदी अथवा मौ. मदनी यांची उद्दिष्टे फारशी वेगळी नव्हती. दोघांनाही मुस्लिम समाजाचे उपखंडात प्रभुत्व हवे होते. हिंदूंची सामर्थ्यवान मध्यवर्ती सत्ता उदयाला येऊ नये असे या दोन्ही विचारप्रवर्तकांना वाटत होते. मुसलमानांचे वेगळे राष्ट्र स्थापून मुस्लिम प्रभुत्व उपखंडात साध्य करता येईल असे जीनांना वाटत होते, तर संयुक्त भारतात इस्लामीकरणाच्या प्रक्रियेने आपण ते साध्य करू असे पुनरुत्थानवाद्यांचे मत होते. मतभेद इस्लामीकरणाच्या प्रक्रियेसंबंधी होते. जीनांचा भर मुस्लिम समाजावर होता, पुनरुत्थानवाद्यांचा धर्माची चौकट कायम ठेवण्यावर होता. मुस्लिम जिथे बहुसंख्यांक आहेत तेथे हिंदूंना समान अधिकार द्यावयास जीनांची हरकत नव्हती. पुनरुत्थानवाद्यांची त्यालाही तयारी नव्हती. थोडक्यात मुस्लिम समाजाला आधुनिकतेने बळकट करून त्याचे प्रभुत्व उपखंडात प्रस्थापित करण्याचा जीनांचा मार्ग होता, तर भारत इस्लाममय करण्याच्या प्रक्रियेने ते प्रस्थापित करण्याचे मनसुबे पुनरुत्थानवाद्यांनी रचले होते आणि म्हणून जीना हे एका दृष्टीने आधुनिक वेषातील पुनरुत्थानवादीच होते. ते आधुनिक भाषेत मध्ययुगीन राजकारण करीत होते. जीनांचे हे चित्र खरे म्हणजे पाश्चात्त्य सुसंस्कृत वेषातील गोरिला माकडाचे चित्र आहे. यावरून आफ्रिकन टोळीवाल्यांना सुसंस्कृत करायला गेलेल्या एका युरोपियन मिशनऱ्याच्या अनुभवाची आठवण येते. नरमांसभक्षक टोळीवाल्यांत काम करायला गेलेल्या ह्या मिशनऱ्याला त्याच्या आईवडिलांनी दहा वर्षांनी पत्र पाठवून आफ्रिकन टोळीवाले गेल्या दहा वर्षांत किती सुसंस्कृत झाले याची माहिती विचारली. मुलाने उत्तर लिहिले, “आता त्यांच्यात खूपच सुधारणा झाली आहे. पूर्वी ते जमिनीवर बसून माणसांना हाताने फाडून नरमांसभक्षण करीत. आता ते टेबलावर बसून काट्या-चमच्याने नरमांसभक्षण करतात." मौ. मौदुदी आणि जीना यांच्या 'मुस्लिम मनातील' फरक आफ्रिकन टोळीवाल्यातील फरकाएवढाच आहे. भारतातील मुस्लिम सुधारणावादाने जमिनीवर बसून नरमांसभक्षण करण्याऐवजी टेबलावर बसून काट्या-चमच्याने नरमांस खाण्यापर्यंत पल्ला गाठला आहे. जीना हे इस्लामच्या परंपरागत सुधारणावादाच्या शोकांतिकेचे प्रतीक आहे.

 जीनांच्या मृत्यूपर्यंत पश्चिम पाकिस्तानातून हिंदू-शीखांची हाकालपट्टी होऊन चुकली होती. (पंजाबमध्ये दंगलीच्या काळात सुमारे एक लाख हिंदू-मुसलमान व शीख स्त्रिया

९६/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान