पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/96

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेसंस्थानिकांना स्वातंत्र्य घोषित करावयास लावावयाचे, त्यांच्याबरोबर संरक्षणाचे करार करून त्यांना संरक्षणाची हमी द्यावयाची, काही सरळ सामील करून घ्यायची आणि काश्मीरवर सरळ टोळीवाल्यांचा हल्ला करून ते जिंकून घ्यावयाचे अशी त्यांची महत्त्वाकांक्षी योजना होती. जुनागड सामील करून त्यांनी पहिला पवित्रा टाकला.
 परंतु पुढचा इतिहास जीनांच्या अपेक्षेप्रमाणे घडला नाही. प्रथमच जीनांना अपयश पदरी घ्यावे लागले. जुनागड भारताने हिसकावून परत घेतले. काश्मीरमध्ये सैन्य घालून टोळीवाल्यांना रेटले. त्रावणकोर, जोधपूर यांसारखी बंडखोर संस्थाने वठणीला आणली. भोपाळच्या नबाबांनी काळाची पावले ओळखून संस्थान भारतात सामील केले आणि जीनांच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी भारतीय सेना हैदराबादमध्ये घुसल्या. भारताचे विघटन करण्याच्या पवित्र्यात जीनांना काश्मीर गमवावे लागले. भारताचे विघटन झाले नाही. या अखेरच्या संघर्षात एकसंध भारत उदयाला आला.
 हे असे का झाले हे मात्र आपण नीटपणे समजून घेतलेले नाही. संस्थानिक सार्वभौम आहेत असे म्हणून भारताच्या विघटनाच्या जीनांनी घेतलेल्या पवित्र्यापुढे जनता सार्वभौम आहे ही ढाल नेहरूंनी पुढे केलेली आहे आणि जीनांचे सारे मनसुबे धुळीला मिळविलेले आहेत. येथे नेहरूंनी जी भूमिका घेतली ती काँग्रेसच्या उच्च आदर्शाशी सुसंगत होती. त्याचबरोबर ही भूमिका घेऊनच भारताचे विघटन टाळता येणार होते. भारतांतर्गत प्रदेशातील बहतेक संस्थानांत बहुतांशक प्रजा हिंदू होती आणि ती भारतात सामील व्हायला उत्सुक होती. प्रश्न काश्मीरचाच होता, जिथे प्रजा मुसलमान होती. आणि म्हणून काश्मीरच्या सामिलीकरणाच्या करारावर तेथील जनतेच्या नेत्यांच्या सह्या घेण्यात आल्या आणि सार्वमताचे आश्वासन दिले गेले. काश्मीरच्या महाराजांच्या कायदेशीर सामिलीकरणावर आपण भर दिला असता तर हैदराबाद, भोपाळ, जुनागड आणि इतर असंख्य मुस्लिम संस्थानिक पाकिस्तानात सामील झाले असते आणि भारताचे विघटन करण्याचे जीनांचे मनसबे आयतेच सफल झाले असते हे नेहरूंचे टीकाकार लक्षात घेत नाहीत व सार्वमताच्या आश्वासनावर चुकीची टीका करतात.
 काश्मीरमध्ये भारताच्या फौजा जाईपर्यंत संस्थानिक सार्वभौम आहेत ही जीनांची भूमिका कायम होती. मग मात्र ते सार्वमताची भाषा बोलायला लागले. काश्मीरमध्ये हल्लेखोर आपण घातलेले नाहीत असे म्हणत असतानाच काश्मीरातून भारताने सैन्य मागे घेतले तर आपण हल्लेखोरांना परत बोलावू असे माउंटबॅटनना सांगून आपण हल्लेखोर पाठविल्याची कबुलीही दिली. भारताच्या विघटनाच्या प्रयत्नात काश्मीर हातचे गमवावे लागेल याची त्यांना कल्पना नव्हती. त्यामुळे पुढे जुनागड सोडण्याची त्यांनी मनाची तयारी केली. परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली होती. जीनांच्या हयातीतच जुनागड परत घेण्यात आले आणि काश्मीरमध्ये उरीपर्यंत टोळीवाल्यांना मागे हटविण्यात आले. हैदराबादची तेव्हा नाकेबंदी करण्यात आली होती. जीना भग्न मन:स्थितीत आजाराने ११ सप्टेंबर १९४८ रोजी निधन पावले.

 पाकिस्थानच्या निर्मितीनंतर जीनांचे हे अपयश भारतीय जनतेने कधी समजून घेतले

भारत - पाक संबंध/९५