पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/91

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेभवितव्य अंधकारमय होईल ही जाणीव त्यांनी कुठे ही बाळगलेली दिसत नाही.
 शीखांच्या बाबतीत तर त्यांनी सूडबुद्धी दाखविली असे मानावयास आधार आहे. एक तर त्यांच्या धमक्यांना शीखांनी भीक घातली नाही, त्यामुळे त्यांना संपूर्ण पंजाब गिळंकृत करता आला नाही. आणि नंतर शीखांनी मुसलमानांविरुद्ध हत्यार उगारले. जाहीररीत्या 'पाकिस्तानातून कोणी जाऊ नये' असे ते सांगत होते तेव्हा पंजाबचे गव्हर्नर सर फ्रान्सिस मूडी “शीखांना शक्य तितक्या लवकर सीमेबाहेर ढकललेले बरे" (पहा- “स्टर्न रेकनींग" ले. जी. डी. खोसला, या पुस्तकात मूडींचे संपूर्ण पत्र उद्धृत केलेले आहे. एक शीख लेखक मला एकदा म्हणाले, “जीना माझ्या वडिलांच्या परिचयाचे होते. त्यांनी मी लाहोर सोडू नये असा वडिलांकरवी मला निरोप पाठवला होता. मी त्यांना विचारले. “आपल्याला काय सुचवायचे आहे? जीनांना हिंदू शीखांना घालवावयाचे नव्हते असेच ना?" त्यांनी होय म्हणून मान डोलवली. यावर मी त्यांना सर फ्रान्सिस मूडीचे पत्र वाचून दाखवले आणि विचारले, “याचा अर्थ काय होतो?" यावर थोडा वेळ थांबून ते म्हणाले, “पश्चिम पंजाबात शीखांची संख्या ११% होती आणि त्यांच्या मालकीची जमीन ३०% होती. शीखांना घालवल्याखेरीज पाकिस्तान हे मुस्लिम राष्ट्र बनू शकत नव्हते. पाकिस्तानातून शीखांना घालविण्यात आले असावे." याची त्यांनी अशी कबुली दिली. गंमत अशी की काश्मिरपासून फराक्का धरणाच्या प्रश्नापर्यंत आणि अल्पसंख्यांकांना दिलेल्या वागणुकीच्या संदर्भात हे सद्गृहस्थ जाहिररीत्या सतत पाकिस्तानची बाजू घेत असतात. दुटप्पीपणालाही काही मर्यादा असते. हे सद्गृहस्थ तीही कुठे पाळताना दिसत नाहीत.) असे जीनांना सुचवीत होते. जीनांच्या मनाचा कल कोणीकडे आहे याचा अंदाज असल्याखेरीज सर फ्रेंन्सिस मूडी त्यांना ही सूचना करतील हे संभवनीय वाटत नाही. अशी सूचना नेहरूंना एखाद्या गव्हर्नरने केली असती काय? आणि केली असती तर नेहरूंची प्रतिक्रिया काय झाली असती याचा अंदाज करणे कठीण नाही.

 वस्तुत: दंगली दोन्ही देशांत होत असताना भारतात भीषण दंगली होत आहेत हा प्रचार जीनांनी आणि पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी सतत चालू ठेवला. याचा परिणाम पाकिस्तानात अधिक दंगली होण्यात होईल हे जीनांना कळत नव्हते असे मानावयाचे काय? दंगली दोन्ही देशांत होत आहेत, दोन्ही देशांत अल्पसंख्यांकांना सुरक्षित राहता आले पाहिजे, दोन्ही देशातल्या सरकारांनी दंगली आटोक्यात आणल्या पाहिजेत अशी भूमिका जीनांनी घेतलेली कुठेही दिसत नाही. भारतात दंगली होत आहेत, मुसलमानांचे शिरकाण होत आहे, तेथून निर्वासितांचे लोंढे येत आहेत, मुसलमानांचे तेथे निर्वशीकरण होत आहे असे म्हणत असतानाच पाकिस्तानात मात्र दंगली होत नाहीत, भारत सरकारने बोलावल्यामुळे येथील हिंदू भारतात जात आहेत असे ते भासवीत होते. दोन्ही देशांतील सरकारांनी अल्पसंख्यांकांबाबत समान धोरण आखावे व गांधीजींनी आणि जीनांनी शांततेचे संयुक्त आवाहन करावे अशी एक सूचना श्री. हसन शरीफ सुहावर्दी आणि चौधरी खलिकुतझमान यांनी गांधीजींना केली. सुहावींनी मसुदा तयार केला. परंतु जीना याला तयार होतील का, असे त्या मसुद्याच्या कागदावर लिहून शंका प्रदर्शित केली. हा मसुदा घेऊन सुहावर्दी आणि खलिकुत्झमान

९०/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान