पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/85

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


त्यांनी उघड दाखविला नाही. परंतु उरलेला भारत हे हिंदूंचे राष्ट्र आहे असे जेव्हा ते म्हणत होते तेव्हा, या भारताविरुद्ध त्यांनी पाकिस्तानच्या स्थापनेनंतर जे शत्रुत्व चालविले होते. ते या देशातील बहुसंख्यांक हिंदुविरुद्ध नव्हते तर कोणाविरुद्ध होते? ते भारताविरुद्ध होते म्हणजे भारतातील मुसलमानांविरुद्ध होते असे समजायचे काय?
 जीनांच्या वक्तव्यातच या प्रश्नांची उत्तरे सापडतात. पाकिस्तान हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र करण्याची आपली भूमिका मांडणारे जे भाषण त्यांनी पाकिस्तानच्या घटनासमितीत केले आहे ते वरवर दिसते तेवढे निरुपद्रवी नाही. पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी आणि भारतातील जीनावाद्यांनी संदर्भ टाळून या भाषणांचे उतारे छापले आहेत आणि लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु 'टाइम्स ऑफ इंडिया' ने त्यांच्या भाषणाचा जो वृत्तांत छापला आहे त्यात "तुम्ही मागचे विसरून कार्य केलेत" या त्यांच्या वाक्याच्या आधी. कंसात “अल्पसंख्यांकांना उद्देशून" असा संदर्भ दिला आहे. कंसातील “अल्पसंख्यांकांना उद्देशून" हा भाग पाकिस्तानची पाकिस्तानात आणि भारतात जी प्रचारयंत्रणा कार्यरत असते तिने नेमका हाच गाळला आहे. याचा अर्थ असा की, मागचे विसरा असे ते पाकिस्तानातील हिंदूंना सांगत आहेत. 'आपण सगळ्यांनी झाले गेले विसरून जाऊया' अशी ही भूमिका नाही. 'तुम्ही मागचे विसरला तर तुम्हाला समान नागरिकत्व उपभोगिता येईल.' असा या विधानाचा अर्थ आहे. तुम्ही मागचे विसरा' या वाक्यात अनेक अर्थ दडलेले आहेत. आता येथे हिंदू बहुमताचे केंद्रीय सरकार नाही, मुस्लिम बहुसंख्यांकांचे सरकार आहे. मुस्लिमांच्या इच्छा-आकांक्षांशी जुळते घेऊनच तुम्हाला या देशात समान अधिकार लाभू शकतील, अशी ही गर्भित धमकी आहे. (टाइम्सचा वृत्तांतही अचूक नाही. कारण जीनांचे उद्गार केवळ हिंदूंना उद्देशून नव्हते. मराठी भाषांतर : जुने वैर गाडून टाकून, भूतकाळ विसरून तुम्ही सहकार्याने काम केलेत तर यश निश्चित मिळेल. तुम्ही तुमची भूतकाळातली भूमिका बदललीत आणि आपली जातपात कोणतीही असो, पूर्वी तुमचे एकमेकांशी संबंध कसेही असोत, तुमचा वर्ण, जात किंवा धर्म काहीही असला तरी, या राज्याचे तुम्ही समान नागरिक आहात, तुमचे हक्क आणि कर्तव्ये एकसारखीच आहेत या भावनेने तुम्ही सर्वांनी मिळून काम केलेत तर : तुमच्या प्रगतीला अंतच राहणार नाही.... आज इंग्लंडमध्ये पूर्वीच्या रोमन कॅथॉलिक आणि प्रॉटेस्टंट जमातीच अस्तित्वात नाहीत असे म्हणता येईल. आज प्रत्येक जण ग्रेट ब्रिटनचा नागरिक आहे आणि तेथे सर्व नागरिक समान आहेत अशी परिस्थिती आहे. हा आदर्श आपण डोळ्यांसमोर ठेवावा असे मला वाटते. तसे झाले तर कालांतराने हिंदू लोक हिंदू राहणार नाहीत आणि मुसलमान लोक मुसलमान राहणार नाहीत. ते राजकीय दृष्ट्या हिंदू किंवा मुसलमान असणार नाहीत, तर या देशाचे राष्ट्रीय नागरिक म्हणून फक्त उरतील.")

 जीनांनी या निवेदनाने द्विराष्ट्रवादाचा त्याग केला असे म्हटले जाते. हेही विधान बरोबर नाही. मुसलमानांचे वेगळे प्रादेशिक राष्ट्र अस्तित्वात आल्यानंतर सर्व भारतातील मुसलमान हे एक वेगळे राष्ट्र आहे ही भूमिका त्यांना पुढे चालविता येणे शक्य नव्हते. द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांतावर दोन वेगळी राष्ट्रे झाल्यानंतर या सिद्धांताची गरजही संपली.

८४/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान