पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/80

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानांची करावी असे त्यांना म्हणावयाचे आहे. त्यांना लोकसंख्येची अदलाबदल अभिप्रेत · असेल तर ते ती भूमिका मांडू शकतात. त्याच्यासाठी गांधी-नेहरूंना खोटे दोष देण्याचे काही कारण नाही.
 लोकसंख्येच्या अदलाबदलीच्या सूचनेमागे फाळणीने हिंदू-मुस्लिम प्रश्न सुटला नाही हे ध्वनित करण्याचा एक प्रयत्न असतो. फाळणीने जातीय प्रश्न मिटला नाही हे खरेच आहे. परंतु फाळणी न होता तो मिटला असता असे म्हणणे ही एक महाभयंकर चूक आहे. फाळणीनंतरदेखील प्रश्न उरला असेल तर त्याची कारणे मुस्लिम समाजाच्या ऐतिहासिक अणि धार्मिक प्रेरणांत शोधून काढावी लागतील. या प्रेरणा हिंदुस्थान अखंड राहिला असता तरी आणि फाळणी होऊन लोकसंख्येची अदलाबदल झाली असती तरीही प्रबळ राहणार होत्या. लोकसंख्येच्या अदलाबदलीनंतर पाकिस्तानच्या रूपाने त्या अधिक प्रबळ बनणार होत्या. कदाचित अधिक मोठे पाकिस्तान आणि आताचा भारतीय उपखंडातील एकूण सोळा कोटी मुस्लिम समाज या दोघांच्या संयुक्त बळाने धार्मिक प्रेरणांच्या आधारावरील लष्करी धर्मवादाच्या संकटाला भारताला तोंड द्यावे लागले असते. हे चित्र जर्मनीच्या लष्करी ध्येयवादाने युरोपला निर्माण केलेल्या समस्येसारखेच दिसले असते. फार थोड्या भारतीयांनी हे सर्व नीट समजावून घेतले आहे.








पाकिस्तानची चळवळ/७९