पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/79

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मोठ्या पाकिस्तानच्या निर्मितीसाठी भारताशी संघर्ष कायम ठेवण्याच्या तयारीला ते लागले.

 येथे एक वेगळा प्रश्न नेहमी चर्चिला जातो. फाळणी अपरिहार्यच होती का? काँग्रेसच्या नेत्यांनी ती आधीच का स्वीकारली नाही? असा प्रश्न अनेकजण विचारतात. दुसरा प्रश्न, लोकसंख्येच्या अदलाबदलीचा, अनेकांच्या मनात येतो. काँग्रेसच्या नेत्यांनी फाळणी स्वीकारताना लोकसंख्येच्या अदलाबदलीचा आग्रह का धरला नाही, असा प्रश्न काँग्रेस नेत्यांचे हिंदू विरोधक विचारताना दिसतात. फाळणी आधी न स्वीकारण्याचे काँग्रेस नेत्यांचे धोरण त्यांच्या लक्षात येऊ नये याचे आश्चर्य वाटते. फाळणी आधी स्वीकारली असती तर अंतिम तडजोड करताना जीनांना अधिक मुलुख सोडावे लागले असते हे कळण्याएवढे ज्ञान गांधी-नेहरूंना होते. अखेरपर्यंत फाळणीला विरोध केल्यामुळेच जीनांना हल्लीचे छोटे पाकिस्तान नाइलाजाने घ्यावे लागले. जीना लोकसंख्येच्या अदलाबदलीला अनुकूल होते असा एक पद्धतशीर खोटा समज गांधींच्या हिंदुत्ववादी विरोधकांनी पसरविला आहे. लोकसंख्येच्या अदलाबदलीतून न्याय्यतेचा आणि व्यवहार्यतेचा प्रश्न बाजूला ठेवला तरी सध्याचे पाकिस्तान मिळाल्यानंतर पाकिस्तानातील तेव्हाच्या पावणेदोन कोटी हिंदू लोकसंख्येच्या अदलाबदलीत भारतातील साडेचार कोटी मुसलमानांना घ्यायची तयारी दाखविली होती असे या मंडळींना सुचवावयाचे आहे काय? (फाळणीच्या वेळची जीनांची सर्व वक्तव्ये पाहिली तर जीनांना लोकसंख्येची अदलाबदल खऱ्या अर्थाने हवी होती असे वाटत नाही. ती होणारच असेल तर पाकिस्तानला अधिक प्रदेश मिळाला पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. पंजाब आणि बंगालच्या फाळणीला आधी विरोध करताना लोकसंख्येची अदलाबदल घडून आल्यास पाकिस्तानला अधिक प्रदेश मिळेल असे त्यांनी म्हटले आहे. याचा अर्थ दंगलींनी मुसलमानांना भारत सोडावा लागल्यास त्यांना सामावता यावे म्हणून अधिक प्रदेश आधीच घेऊन ठेवावा हे त्यांचे धोरण होते. जीनांना कोणत्याही उच्च धर्मनिरपेक्ष आदांकरिता लोकसंख्येची अदलाबदल हवी होती असे अर्थातच समजण्याचे कारण नाही. भारतातून मुस्लिम लोकसंख्या बाहेर निघणे म्हणजे तेथील ऐतिहासिक मुस्लिम संस्कृतीचा आणि वारशाचा अंत होणे आहे हे जीनांना कळत होते आणि तसे होण्याची कल्पनाच जीनांना असह्य होणारी होती. दुसरे असे की भारतीय राजकारणात मुस्लिम एक प्रभावी शक्ती म्हणून वावरावे आणि भारतीय राजकारणावर पाकिस्तानला अनुकूल असा परिणाम घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील राहता यावे अशी त्यांची मनापासून भूमिका होती. पाकिस्तानातील हिंदू येथील राजकारणात प्रभावी शक्ती म्हणून वावरणार नाहीत असे त्यांना वाटत होते. त्यांना शीखांची काळजी वाटत होती. त्यांच्या बाबतीत त्यांनी त्यांना घालवून देणारा 'अंतिम सोडवणुकीचा' (Final Solution) उपाय कसा अवलंबिला याची या प्रकरणात पुढे चर्चा केलेली आहे.) जीना एवढे समंजस होते असे या मंडळींना सुचवायचे असेल तर त्यांनीच अशी सूचना का केली नाही? लोकसंख्येच्या अदलाबदलीची ही भूमिका मांडणाऱ्यांना खरे तर दंगली अभिप्रेत आहेत. पाकिस्तानातून ज्या पद्धतीने हिंदूंची हकालपट्टी करण्यात आली तशी येथील

७८/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान