पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/67

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



 भारतीय मुसलमानांच्या वेगळ्या राष्ट्राची मागणी याआधी होऊन चुकली होती. सरहद्द प्रांतात राजकीय सुधारणांचा विचार करण्यासाठी ब्रिटिश सरकारने नेमलेल्या एका समितीपुढे साक्ष देताना डेरा इस्माइलखान मुस्लिम अंजुमनचे अध्यक्ष सरदार महमद गुलखान यांनी मुस्लिम बहुसंख्यांक प्रांतांचे वेगळे राष्ट्र केले जावे असे प्रतिपादन केले. ते म्हणाले, “हिंदूमुस्लिम ऐक्य प्रस्थापित होणेच शक्य नाही... त्यांना (हिंदूंना) कन्याकुमारी ते आग्रा हा दक्षिणेचा सर्व भाग देऊन टाका आणि आग्रा ते पेशावर हा प्रदेश आम्हाला (मुसलमानांना) द्या. मला असे म्हणताना लोकसंख्येची अदलाबदल अभिप्रेत आहे. मी अदलाबदल सुचवितो आहे, कत्तली नव्हेत.” (पहा - 'Islam in Indian Transition to Modernity' ले. म. अ. करंदीकर, पृ. १७२)
 १९३० साली अलाहाबाद येथे भरलेल्या मुस्लिम लीगच्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून भाषण करताना मुसलमानांचे भारताच्या वायव्य भागात स्वतंत्र राष्ट्र व्हावे अशी इच्छा इक्बाल यांनी व्यक्त केली. इक्बाल यांच्यासंबंधीदेखील जीनांप्रमाणेच बराच गोंधळ राजकीय टीकाकारांच्या मनात राहिला आहे. त्यांनी आरंभी 'सारे जहाँसे अच्छा' सारखी देशभक्तीपर गाणी लिहिली हे त्याचे कारण आहे. देशभक्तीपर गाणी लिहिणाऱ्या इक्बाल यांची मनाची पहिली अपरिपक्व अवस्था होती. तेव्हा 'इस्लामचे भाष्यकार' म्हणून ते मिरवत नव्हते. परंतु ते युरोपला जाऊन आले आणि पाश्चात्त्यांचा भौतिकवाद आणि पौर्वात्यांचा (म्हणजेच हिंदूचा) अतिरिक्त अध्यात्मवाद दोन्हीही मानवजातीला घातक असल्याचा त्यांना साक्षात्कार झाला. इस्लाम हा मानवजातीच्या सर्व दुःखांवर रामबाण उपाय आहे असे त्यांचे मत बनले. राजकारण आणि धर्म यांची मुसलमान फारकत करू शकत नाहीत, अशी त्यांची भूमिका होती. वेगळ्या राष्ट्राची कल्पना मानणाऱ्या १९३० च्या भाषणातच त्यांनी पुढे म्हटले आहे. - "Is it possible to retain Islam as an ethical ideal and to reject it as a policy in favour of national politics in which religious attitude is not permitted to play any part? This question becomes of special importance in India where the Muslim happen to be in a minority."

 धर्मकायद्याबाबतीत इक्बालनी इज्तिहादचा ('Reconstruction of Religious Thruoght in Islam,' 1934, pp. 153-56, 173-76) पुरस्कार केला आहे. परंतु बिगर मुस्लिम कायदेमंडळाला मुसलमानांच्या बाबतीत कायदे करण्याचा अधिकार नाही असे म्हटले आहे. मुसलमानांबाबत इतरांना कायदे करण्याचा अधिकार नाही, मुसलमानांच्या सत्तेलाच आहे, ही भूमिका घेतल्यानंतर मुसलमानांचे वेगळे राष्ट्र मागणे ओघानेच येते. मुसलमानांच्या राष्ट्रात इतरांना त्यांच्या धर्माप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य मिळेल असे त्यांनी म्हटले आहे. या बिगर मुसलमानांबाबत कायदे करण्याचा मुस्लिम बहुसंख्यांक कायदेमंडळाला अधिकार आहे का? शिवाय वायव्य भागात मुस्लिम राष्ट्र बनल्याने उपखंडातील इक्बालना सतावणारे मुसलमानांचे प्रश्न सुटत नव्हतेच. उदाहरणार्थ, उरलेल्या भारतात कायदेमंडळ हिंदू बहुसंख्यांकांचेच राहणार होते. तेथील मुसलमानांबाबतीत कायदे करण्याचा त्या कायदेमंडळाला

६६/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान