पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/66

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 मुसलमानांना हिंदूंच्या वर्चस्वाची भीती दाखवून आणि त्यांच्या धार्मिक प्रेरणांना आवाहन करून आपल्यामागे संघटित करणे हे जीनांनी आपले उद्दिष्ट ठरविले होते. मुसलमानांचे आपण एकमुखी नेते व्हावे ही त्यांची इच्छा जुनीच होती. परंतु तेव्हा हिंदुवर्चस्वाची भीती ते दाखवीत. मुसलमानांच्या मागण्यांना उचलून धरले की आपल्याकडे एकमुखी नेतृत्व येईल अशी त्यांची पूर्वी अटकळ होती. म्हणून कधी काँग्रेसबरोबर करार करून तर कधी करार करण्याचे टाळून आपण मुसलमानांच्या हितसंबंधाचे रक्षणकर्ते आहोत अशी भूमिका ते घेत. परंतु त्यांच्यामागे मुस्लिम समाज एकवटला नाही. १९३७ च्या निवडणुकीत लीगला आलेल्या प्रचंड अपयशामुळे ते हादरले. नेहरूंच्या मुस्लिम जनसंपर्काच्या घोषणेने आपले उरलेसुरले पाठबळ कमी होईल अशी भीती त्यांना वाटणे स्वाभाविक होते. हिंदुवर्चस्वाची भीती आणि धर्मवादाचे आवाहन या दोन हत्यारांनी त्यांनी आपले स्थान बळकट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना त्यात कमालीचे यश लाभले.
 दरम्यान त्यांच्या मागण्यांची कमान वाढतच होती. १९३८ साली नेहरूंना लिहिलेल्या पत्रात त्यांनी आपल्या चौदा मुद्यांच्या मसुद्यात आणखी भर घातली. आता त्यांना उर्दू ही भारताची राष्ट्रभाषा व्हायला हवी होती. मुसलमानांना गोहत्येचे अनिर्बंध स्वातंत्र्य मिळाले पाहिजे असे दुसरे मागणे होते. काँग्रेसने तिरंगी ध्वज बदलावा आणि मुस्लिम लीगच्या ध्वजाचा आपल्या ध्वजात फेरबदल करून अंतर्भाव करावा अशी त्यांनी मागणी केली. 'वंदे मातरम्' हे काँग्रेसने राष्ट्रगीत म्हणून म्हणू नये. मुस्लिम सामाजिक कायद्याला घटनेत संरक्षण मिळावे इत्यादी इतर मागण्या होत्या. या मागण्या काँग्रेस मान्य करणे काँग्रेसला शक्यच नव्हते. पिरपूर अहवालाच्या प्रसिद्धीनंतर मुस्लिम जनमत प्रक्षुब्ध झाले आणि मे १९४० मध्ये लोहोर येथे भरलेल्या मुस्लिम लीगच्या अधिवेशनात मुस्लिम बहुसंख्यांक प्रांतांचे वेगळे राष्ट्र मागणारा ठराव मंजूर झाला. या ठरावानंतर केलेल्या भाषणात जीनांनी मुस्लिम वेगळेपणावर भर दिला.

 भारतीय मुसलमान एक राष्ट्र आहेत असे ते म्हणतच होते. ही भूमिका शाह वलिऊल्ला याने धार्मिक परिभाषेत आणि सर सय्यद अहमदखान यांनी आधुनिक परिभाषेत मांडली. स्वातंत्र्य मिळण्याची सर सय्यद अहमदखान यांच्या काळात काहीच शक्यता नव्हती आणि म्हणून वेगळे राष्ट्र निर्माण करण्याची भाषा ते बोलले नाहीत. तथापि, हिंदू आणि मुसलमान एका राष्ट्रात एकत्र नांदू शकणार नाहीत, याचा अर्थ हा देश स्वतंत्र होईल तेव्हा ते वेगळे झालेले बरे, असाच होता. १९४० साली स्वातंत्र्य नजीक येऊन ठेपले होते आणि म्हणून ते राष्ट्र मागण्याची मुस्लिम मनोभूमी तयार झाली होती. क्रमाक्रमाने मुस्लिम समाज समान भागीदारीच्या मागण्यांकडे वळत होता. मुस्लिम समाज हे एक राष्ट्र आहे असे मानणाऱ्या जीनांनी प्रथम तेहतीस टक्के आणि ते न मिळाल्यास वेगळे राष्ट्र अशी भूमिका घेतलेली आहे. तेहतीस टक्के वेळीच दिले असते तरीही वेगळ्या राष्ट्राच्या सुप्त आकांक्षा बाळगणारा समाज त्या मागणीपर्यंत जाऊन पोहोचलाच असता. ते न दिले गेल्यामुळे अखेरीला पोहोचलाच हा एक केवळ ऐतिहासिक योगायोग आहे आणि मुस्लिम सुशिक्षितांनी आपल्या हेतुपूर्तीसाठी युक्तिवादात वापरलेला बहाणा आहे.

पाकिस्तानची चळवळ/६५